योगासने, मेडिटेशन करून पोलीस, आरोग्य कर्मचारी घालवत आहेत थकवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:57+5:302021-05-13T04:32:57+5:30
जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोरोना संकटाशी आरोग्यसेवक आणि पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहेत. पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोरोना संकटाशी आरोग्यसेवक आणि पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहेत. पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासोबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ििजिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून बंदोबस्त करावा लागत आहे, तर आरोग्यसेवक, सेविका, आशा वर्कर यांच्याकडून नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे, तर कोरोना रुग्णालय, तसेच कोविड केअर सेंटरमध्ये डाॅक्टर, परिचारिका ड्यूटी करीत आहेत. बाधित रुग्णांशी थेट संपर्क येत असतानाही त्या आपले कर्तव्य निष्ठेने, प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. हे सर्व करताना, आरोग्य कर्मचारी व पोलिसांवर ताण येत आहे.
कोट...
कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक ताण वाढला आहे. ताण कमी करण्यासाठी डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी योगा, विपश्यना करणे गरजेचे आहे. नियोजन केल्यास ताण कमी होण्यास मदत होते. शासनाकडून योगा, विपश्यना करण्याबाबत सूचना आलेल्या आहेत.
-डॉ. हनुमंत वडगावे
१० मिनिटे वेळ देणे गरजेचे
जिल्ह्यात रुग्ण हाताळ्यासाठी डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ताण येत आहे. कोविड वाॅर्डात काम करताना सतत पीपीई किट घालून काम करावे लागते. त्यामुळे वेळेवर जेवण व पाणी पिण्यात येत नाही. शरीराला आठ तास झोप आवश्यक आहे. शारीरिक व मानसिक ताणामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. कोरोना कक्षात काम करीत असल्याने बाधित होण्याचा धोकाही वाढतो. ताण कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी १० मिनिटे वेळ काढून अनापान करावे. त्यामुळे दिवसभर कामात उत्साह राहतो.
-डॉ. महेश कानडे, मानसोपचारतज्ज्ञ
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे डॉक्टरांवर मानसिक ताण येत आहे. सध्या कधी बारा, तर कधी २४ तासांची ड्यूटी करावी लागत आहे. त्यात शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. सकाळी अर्धा तास योगासने व प्राणायम करीत आहोत.
-डॉ. सतीश आदटराव,
मागील महिनाभरापासून बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड सेंटरमध्ये काम करताना आरोग्य कर्मचारी बाधित होत आहेत. त्यामुळे सध्या १२ तास ड्यूटी करावी लागत आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. मात्र, कर्तव्य बजावणेही महत्त्वाचे आहे. रुग्णांची काळजी घेत स्वत: सुरक्षित राहावे लागत आहे.
-अबोली कांबळे, परिचारिका
आम्ही माणूस आहोत. आम्हालाही कोरोनाचा धोका आहे. लहान मुलामुळे घरी जाण्याची भीती वाटते. मात्र, तरीही पोलिसांवर आरोप होतात. नागरिकांनी या काळात घरी राहिल्यास पोलिसांचा ताण कमी होईल.
-पोलीस कर्मचारी, उस्मानाबाद
दिवसभर उन्हातान्हात बंदोबस्त करावा लागतो. सध्याची परिस्थिती भयंकर असून, नेहमी स्वस्त:सह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी भेडसावते; पण पोलिसांचे काम नागरिकांच्या सुरक्षेसाठी असून, ते काम आम्ही पार पाडत आहोत व नेहमी करत राहणार. स्वास्थ्य राखण्यासाठी सकाळी १५ ते २० मिनिटे योगा करतो.
-पोलीस कर्मचारी, उस्मानाबाद