कोरोना लसीचे १० हजार डोस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:17+5:302021-04-25T04:32:17+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. आता दिवसाकाठी सहाशे ते सातशे रुग्णांची भर पडू लागली आहे. ...
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. आता दिवसाकाठी सहाशे ते सातशे रुग्णांची भर पडू लागली आहे. मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. हा संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत लस तुटपुंजी मिळत आहे. आठवड्याला १ लाख डोसची मागणी करण्यात येत आहे. मात्र, मिळत आहेत केवळ नऊ ते दहा हजार.
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य विभागाने लसीच्या सुमारे ५ लाख डोसची मागणी केली होती. परंतु, मागील तीन महिन्यांत केवळ सव्वा लाख डोस उपलब्ध झाले आहेत. सध्या संसर्ग मोठ्या गतीने वाढू लागला आहे. प्रतिदिन सहाशे ते सातशे रुग्ण आढळून येत आहेत. मृतांच्या संख्येतही भर पडत आहे. हा वाढता धोका विचारात घेऊन आरोग्य विभागाकडून आठवड्याला लसीच्या १ लाख डोसची मागणी केली जात आहे. परंतु, शासनाकडून केवळ ९ ते १० हजार डोस उपलब्ध करून दिले जात आहेत. मागणीच्या प्रमाणात डोस तुटपुंजे मिळत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला नियोजन करणे कठीण झाले आहे. उपलब्ध डोस पुण्याहून आणण्यासाठी दोन ते तीन दिवस जातात. लस आल्यानंतर जिल्हाभरात वाटपासाठी दोन दिवस जातात आणि ही लस अवघ्या दोन ते तीन तासांत संपते. मागील आठवड्यात असाच अनुभव आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. चालू आठवड्यातही १ लाख डोसची मागणी केली आहे. मात्र शासनाने १० हजारच देऊ केले आहेत. हे डोस रविवारी जिल्ह्यात दाखल होतील, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.
चौकट....
पुणे येथून लस आणण्यासाठी वाहन पाठविले आहे. शासनाने जिल्ह्याला १० हजार डोस देऊ केले आहेत. ही लस रविवारी उपलब्ध होईल. यानंतर तातडीने वितरण करून लसीकरण सुरू केले जाईल.
- डॉ. मिटकरी, लस विभागप्रमुख