तरुण शेतकऱ्यांची भारीच 'टेक्निक'; मातीच्या बेडवर नव्हे, २२ हजार कुंड्यात फुलवली फूलशेती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 06:33 PM2022-03-07T18:33:52+5:302022-03-07T18:34:32+5:30

मातीच्या बेडऐवजी फुलदाणी म्हणून वापरण्यात येणाऱ्या कुंडीचा वापर करत त्यांनी सुनियोजित पद्धतीने ३० गुंठ्यात एक महिन्यापूर्वी जरबेरा फुलाची लागवड केली

Young farmers' new 'technique'; Flower cultivation in 22,000 pots, not on earthen beds | तरुण शेतकऱ्यांची भारीच 'टेक्निक'; मातीच्या बेडवर नव्हे, २२ हजार कुंड्यात फुलवली फूलशेती

तरुण शेतकऱ्यांची भारीच 'टेक्निक'; मातीच्या बेडवर नव्हे, २२ हजार कुंड्यात फुलवली फूलशेती

googlenewsNext

कळंब : दुष्काळग्रस्त, पारंपरिक शेती करणारा भाग अशी कायम ओळख असलेल्या कळंब तालुक्यात काही तरुण शेतकऱ्यांनी नवप्रयोगाची कास धरली आहे. यातूनच बोर्डा येथे तीन तरुणांनी एकत्र येत तब्बल ३० गुंठे क्षेत्रात २२ हजार मातीच्या कुंड्यांचा वापर करत मृदेच्या बेडचा वापर न करता फूलशेती सुरू केली आहे.

तालुक्यातील बोर्डा येथील तरुण शेतकरी चव्हाण बंधू हे शेतीमातीशी जोडले गेलेले कुटुंब. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी ही मंडळी शेतीमध्येही तितकीच प्रयोगशील, सातत्यानं नवप्रयोगाची कास धरणारी अन् नवतंत्राचा अवलंब करणारी.

यापैकीच शीतल आणि दिनेश या चव्हाण बंधूंनी आपले शेजारी मित्र शांतीलिंग करंडे यांच्यासमवेत यंदा पुन्हा एका नव्या प्रयोगाला आकार दिला आहे. यासाठी आपल्या पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलवायचा; पण प्रचलित पद्धतीने नव्हे तर नव्या 'टेक्निक' चा वापर करत असा त्यांनी निश्चय केला होता.

त्यानुसार मातीच्या बेडऐवजी फुलदाणी म्हणून वापरण्यात येणाऱ्या कुंडीचा वापर करत त्यांनी सुनियोजित पद्धतीने ३० गुंठ्यात एक महिन्यापूर्वी जरबेरा फुलाची लागवड केली आहे. यामुळे त्याचा लागवड, उत्पादन खर्च कमी तर मेहनत, मशागत हलकी होणार आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची प्रयोगशील शेतकऱ्यांत चांगलीच चर्चा होत आहे.

कर्नाटकातून आणल्या २२ हजार कुंड्या
मातीच्या बेडवर आजवर त्यांनी जरबेरा फूलशेती केली. यात जोखीम वाढली, खर्च वाढला. परत यासाठी लागणारे शेणखत व गेरू माती मिळणे कठीण झाले. यामुळे या मातीच्या बेडला फाटा देत चव्हाण व करंडे यांनी आपल्या ३० गुंठे क्षेत्रासाठी बेळगाव येथून मातीच्या ‘लाईट वेट’ २२ हजार ५०० कुंड्या आणत त्या लोखंडी स्टॅण्डवर बसवल्या. यावर पुढे शेती फुलवली आहे.

कुंड्या, कोकोपीट, रोपे, ड्रिप अन्....
या कुंड्यात पुणे येथून प्रत्येकी ४० रुपयाला एक याप्रमाणे साडेबावीस हजार रोपे आणली. ती कोकोपीटच्या सहाय्याने लावली. यास ड्रिपने दिवसांतून तीनदा, प्रत्येकी २४० मिली पाणी तसेच खत, औषधी दिली जात आहेत. यामुळे तर खर्च वाचलाच, शिवाय प्लॉटची लाईफ वाढेल, असे शीतल चव्हाण व दिनेश चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Young farmers' new 'technique'; Flower cultivation in 22,000 pots, not on earthen beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.