पदवीधर तरुणाने माळरानावर फुलविली मिरचीची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:22 AM2021-07-01T04:22:44+5:302021-07-01T04:22:44+5:30
तामलवाडी : आजकाल बहुतांश तरुण शिक्षण घेऊन नोकरी, पैशाच्या मागे लागल्याचे दिसतात; परंतु तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील अभिजित राजकुमार ...
तामलवाडी : आजकाल बहुतांश तरुण शिक्षण घेऊन नोकरी, पैशाच्या मागे लागल्याचे दिसतात; परंतु तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील अभिजित राजकुमार पाटील या तरुण शेतकऱ्याने पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मिळालेल्या अर्धा लाख रुपये पगाराची नोकरी सोडून नव्या तंत्रज्ञानाने शेती करण्याचा विडा उचलला आणि यात तो यशस्वीही ठरला आहे. त्यांनी अडीच एकर माळरान जमिनीवर ३२ हजार ढोबळी मिरचीची रोपे उत्तमरीत्या जगवून इतर शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
तुळजापूर तालुक्यात कुसळ्या माळरान जमीन मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सावरगाव साठवण तलावामुळे शिवारातील माळरान जमिनी ओलिताखाली आल्या. सावरगाव येथील अभिजित राजकुमार पाटील यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेऊन एका खासगी कंपनीत नोकरी मिळविली. तेथे त्यांना दरमहा ५५ हजार रुपये पगार मिळत होता. मात्र, त्यांना नोकरी सोडून शेती करण्याचा कानमंत्र वडील तथा जि.प. सदस्य राजकुमार पाटील यांनी दिला. यानुसार अभिजित यांनी गावी शेती करण्याचा निर्णय घेत अडीच एकर माळरान जमिनीवर ठिबक संच, पॉलिथीन पेपरचा आधार घेत ढोबळी मिरचीच्या ३२ हजार रोपांची लागवड दोन महिन्यांपूर्वी केली. उत्तमरीत्या नियोजन करून अभ्यासपूर्ण तंत्रज्ञानाने मिरची रोपाची निगा राखल्याने सध्या मिरचीच्या रोपांना फळधारणा सुरू झाली आहे. झाडाच्या फांद्याना दोरीने बांधणी करून फळाच्या वजनाने झाड मोडू नये, मिरचीचा जमिनीला स्पर्श होऊन ती खराब होऊ नये, यासाठी त्यांनी फाटे बांधणी केली आहे. शेतीचा कसलाही पूर्वानुभव नसताना केवळ स्वत:च्या अभ्यासातून अभिजित यांनी केलेल्या मिरची लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. झाडाची जोपासना, तसेच कीड नियंत्रण व मिरची फळाची झालेली फुगवण पाहण्यासाठी मोहोळसह परिसरातील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या.
चौकट
फळभाज्यांकडे कल वाढला
हंगामी बागायत क्षेत्र वाढले आहे
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव भागात हंगामी बागायत शेतीचे क्षेत्र वाढले आहे. द्राक्षासह शेतकरी कारले, दोडके, टोमॅटो, पडवळ, भोपळा, ढोबळी मिरची, वांगे आदी वेलवर्गीय फळभाज्या घेण्याकडे कल वाढला आहे. धोत्री, खडकी, सावरगाव, काटी आदी गावच्या शिवारात पालेभाज्या, फळभाज्यांचे मळे पाहावयास मिळत आहेत.