अक्कलपाड्यातून १० हजार क्युसेसचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:36 PM2019-09-14T22:36:35+5:302019-09-14T22:37:00+5:30
पांझरेला पुन्हा पूर : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
धुळे : शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आणि साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात संततधार पाऊस सुरु आहे़ दमदार पावसामुळे धरणांमधूनही पाणी सोडले जात आहे़ शनिवारी सकाळी १० वाजेनंतर अक्कलपाडा धरणातून तब्बल १० हजार क्युसेस प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे़ त्यामुळे पांझरा नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे़ नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे़ सुरक्षितता म्हणून गणपती मंदिराजवळ पोलीसही तैनात करण्यात आले़
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १३९ टक्के पाऊस झालेला आहे़ जिल्ह्यातील चारही तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली आहे़ साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात तर पावसाची संततधार सुरुच आहे़ आमळी, पिंपळनेर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मालनगाव, जामखेली, लाटीपाडा ही धरणे शंभर टक्के भरुन वाहत असल्याने अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढली आहे़ सकाळी १० वाजेच्या सुमारास पांझरा नदीपात्रात प्रति सेंकद १० क्युसेस याप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे़
गेल्या दोन दिवसांपुर्वी देखील अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे पांझरा नदी दुथडी भरुन वाहत आहे़ त्यात पुन्हा शनिवारी पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीला पूर आलेला आहे़ हे पाणी हळूहळू धुळ्यात येत असल्यामुळे नदी काठच्या नागरीकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे़ पाण्याचा वाढणारा प्रवाह आणि नागरीकांनी नदीपात्रात जावू नये, त्यांचे जीवन सुरक्षित असावे यासाठी गणपती मंदिराजवळ पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे़ पुराची शक्यता असल्याचे समोर येत आहे़