१० लाखांचा बेकायदा खतांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:25 PM2019-07-09T16:25:47+5:302019-07-09T16:26:11+5:30
सातरणे शिवार : दोघांविरुध्द गुन्हा नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील सातरणे गावात प्रतिबंधीत खतांची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्याने भरारी पथकाने खातरजमा केली़ जून महिन्यात तब्बल १० लाखांचा खतसाठा जप्त केला होता़ याप्रकरणी दोघांविरुध्द पोलिसात तक्रार झाल्याने गुन्हा दाखल झाला़
धुळे तालुक्यातील सातरणे येथे निर्माण फर्टीलायझर प्रा़ लि़ येथे प्रतिबंधीत खतसाठा असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच भरारी पथकाने याठिकाणी तपासणी केली होती़ यावेळी सेंद्रीय खतांमध्ये रासायनिक खतांची भेसळ आढळून आली होती़ परिणामी यात विविध कंपन्यांचा सुमारे ६३ टन खतांचा साठा जप्त केला होता़ या खतांची किंमत ९ लाख ५५ हजार ७४० रुपये इतकी होती़ या प्रकरणी नाशिक येथील उल्हास प्रल्हाद ठाकूर यांनी रितसर धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली़ त्यानुसार, सोमवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास शशांत शंकर गायकवाड प्रॉडक्शन मॅनेजर, अकोला व निर्माण फर्टीलायझर प्रा़ लि़ चे मालक यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे़