चोरीच्या १० दुचाकी मोहाडीच्या तरुणाकडून हस्तगत, धुळे तालुका पोलिसांची कारवाई
By देवेंद्र पाठक | Published: February 20, 2024 05:34 PM2024-02-20T17:34:44+5:302024-02-20T17:35:27+5:30
धुळे तालुक्यातील चितोड येथील महेंद्र बोरसे यांची दुचाकी (एमएच १८ सीए १२०५) शिरुड चौफुली येथून ९ फेब्रुवारी रोजी चोरट्याने लंपास केली होती.
धुळे : गोपनीय माहितीच्या आधारावर मोहाडी उपनगरातील एका तरुणाच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून चोरीच्या ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील व त्यांच्या पथकाने हस्तगत केल्या. तरुणाचा दुसरा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील व पथक उपस्थित होते. धुळे तालुक्यातील चितोड येथील महेंद्र बोरसे यांची दुचाकी (एमएच १८ सीए १२०५) शिरुड चौफुली येथून ९ फेब्रुवारी रोजी चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात १० फेब्रुवारी रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाचा तपास सुरू असताना मोहाडी उपनगरातील गोपाल देवीदास पाटील (वय ३८) याने चोरी केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून गोपाल याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. शिवाय ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी पोलिसांना काढून दिल्या. याकामी त्याचा एक साथीदार असून तो फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव काळे, कर्मचारी सुनील जावरे, ललित खळगे, रवींद्र सोनवणे, सुरेंद्र खांडेकर, राजू पावरा, राहुल देवरे, संदीप गुरव, दीपक मोहिते, योगेश वानखेडे, प्रमोद पाटील, अमोल कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.