अक्कलपाडा आवर्तनाचा १०० गावांना फायदा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:44 AM2018-02-14T11:44:43+5:302018-02-14T11:45:33+5:30
२०० दलघफू पाणी : धुळे, शिंदखेड्यासह अमळनेर तालुक्यातील गावांचा प्रश्न सुटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पांझरा नदीकाठावर पाणीपुरवठा योजना असलेल्या १०० पेक्षा जास्त गावांना अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून लवकरच सुटणाºया आवर्तनाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने धुळे पाटबंधारे विभागाला आदेश दिले असून साक्री तालुक्यातील पुनर्वसित तामसवाडी गावाजवळ असलेल्या बंधाºयाच्या फळ्या काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून बुधवारी किंवा गुरूवारी प्रकल्पातून २०० दलघफू पाण्याचे आवर्तन सुटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणाºया आवर्तनाचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील मुडावदपर्यंत पोहचणे अपेक्षित असते. तेथे पाणी पोहचले की ते आवर्तनाचे यश मानले जाते. कारण मुडावद हे आवर्तनाचे शेवटचे गाव आहे. तेथून पुढे गेल्यानंतर तेथे पांझरा व तापी या दोन नद्यांचा संगम होतो. त्या ठिकाणी पांझरा ही तापी नदीत विलीन होते. त्यामुळे आवर्तनाचे पाणी पुढे गेल्यास तापी नदीत पोहचणार असते. त्यामुळे मुडावद येथील के.टी. वेअर बंधाºयात पाणी पोहचले की अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन थांबविले जाते. या पाण्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष १०० पेक्षा जास्त गावांना फायदा होतो. त्यातील ९० गावे धुळे जिल्ह्यातील तर १०-१५ गावे जळगाव जिल्ह्यातील असतात, असे सूत्रांनी सांगितले. धुळे व शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी पांझरा नदीकाठी आहेत.
दरवर्षीच होते कसरत
अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडावयाचे असल्यास सर्वप्रथम नदीपात्रातील बंधाºयांच्या फळ्या काढल्या जातात. या बंधाºयांच्या एकेका फळीचे वजन सुमारे ९० किलोपर्यंत असते. त्यामुळे बंधाºयातील फळ्या काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.