शिरपूर तालुक्यात १०३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:33 AM2020-08-18T11:33:28+5:302020-08-18T11:33:46+5:30

बंधारे झाले ‘ओव्हरफ्लो’ : तीन दिवसांपासून श्रावणसरींचा दमदार वर्षाव

103 percent rainfall in Shirpur taluka | शिरपूर तालुक्यात १०३ टक्के पाऊस

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरासह तालुक्यात गेल्या ३ दिवसापासून श्रावणसरींचा दमदार वर्षाव होत आहे़ सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे़ दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरूच आहे. दरम्यान, आज शेवटचा श्रावण सोमवार होता. मात्र, अद्यापही कोरोनाच्या संकटामुळे भक्तांना दर्शनाचा लाभ घेता आलेला नाही़
शहर व परिसरात गेल्या बुधवारपासून मध्यम सरींचा वर्षाव होत आहे़ शिरपूर मंडळात १३ रोजी १० मिमि, १४ रोजी ७९, १५ रोजी ४ तर १६ रोजी १७ मिमि पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ रविवारी देखील रिमझिम पावसाच्या सरी पडल्या़ या श्रावणीसरींमुळे वातावरणात मोठा गारठा निर्माण झाला आहे़
गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने गेल्या ३ दिवसापासून संततधार सुरुच ठेवली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे़ दरम्यान, धरण क्षेत्रात देखील पाऊस होत असल्यामुळे धरणसाठा वाढ होण्यास मदत होत आहे़ तालुक्यात पावसाची सरासरी ६४६ मिमि असतांना या तालुक्यात आतापावेतो ६६२ मिमि इतका पाऊस झाला आहे, म्हणजेच १०३ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ गतवर्षी तालुक्यात २३७ टक्के पाऊस झाला होता़
१६ रोजी मंडळनिहाय झालेला पाऊस तर कंसात आतापर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर मंडळात १७ मिमि (६६२ मिमि), थाळनेर ८ (६१४), होळनांथे ६ (३१९), अर्थे ८ (५१०), जवखेडा ९ (४३९), बोराडी ७ (४८६), सांगवी मंडळात ७ मिमि (५५०) पावसाची नोंद करण्यात आली आहे़ करवंद येथील मध्यम प्रकल्पात आतापर्यंत ८६़४० टक्के तर अनेर मध्यम प्रकल्पात ४०़५३ टक्के पाण्याचा साठा आहे़ १५ आॅगस्टपासून अनेर धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आल्यामुळे आता पाण्याचा साठात वाढ होत आहे़ तसेच तालुक्यातील १३ पैकी ४ लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे़ निम्मेच्यावर पावसाळा होत आला तरी बुडकी, मिटगांव, रोहिणी, वाडी धरणे कोरडे आहेत़ अभाणपूर ३१ टक्के, बुडकी ०, गधडदेव १६, जळोद २२, कालीकराड १२, खामखेडा ६०, लौकी १२, मिटगांव ०, नांदर्डे २३, रोहिणी ३, विखरण ३३, वाडी ६ तर वकवाड २७ टक्के पाण्याने भरले आहे़
१७ रोजी जिल्ह्यात धुळे तालुका- ५ मि.मी., साक्री- ६ मि.मी., शिरपूर- १ मि.मी., शिंदखेडा- २ मि.मी. असा एकूण १४ मि.मी. पाऊस झाला.
नेरला सतर्कतेचा इशारा
नेर- गेल्या ४ ते ५ दिवसांपासून संततधार सुरू आहे. अक्कलपाडा धरणात जलसाठा वाढल्याने धरणाचे चार दरवाजे उघडले आहे. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने नदीला पूर आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सरपंच शंकरराव खलाणे यांनी केले आहे.

Web Title: 103 percent rainfall in Shirpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.