११ कोटींच्या अनुदान निधीची देयके मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:32 PM2018-03-28T22:32:56+5:302018-03-28T22:32:56+5:30
धुळे कोषागार कार्यालय : जिल्हाधिका-यांनी भेट देऊन घेतली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मार्चअखेर विविध विभागांना प्राप्त होणा-या अनुदानातून निधी खर्चासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाकडे मंजुरीसाठी मोठ्या संख्येने देयके (बिल) प्राप्त होत आहेत. बुधवारी संध्याकाळपर्यंत ११ कोटी २४ लाख ७ हजार ८६० रु. निधीच्या देयकांना मंजुरी देण्यात आली. तर विविध विभागांकडून नव्याने ५४५ देयके कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयास भेट देवून विविध विभागांचे निरीक्षण केले. गजानन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अपर कोषागार अधिकारी चैतन्य परदेशी, उपकोषागार अधिकारी एस.के. चौधरी, योगेश सोनवणे, उदय पाठक, अशोक खैरनार, पंकज देवरे, दिनेश खैरनार आदी उपस्थित होते. मार्च अखेरचे व्यवहार तपासणे, निरीक्षण करण्यासाठी ही भेट होती.
त्यांनी वित्त विभागांतर्गत सुरू केलेल्या सर्व आॅनलाइन प्रणालीबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यात सेवार्थ, ग्रास, सीएमपी, स्टॅम्प्स मोड्यूल, निवृत्तीवेतन, वाहिनी, बीम्स प्रणाली आदींचा समावेश आहे. जिल्हाधिका-यांनी सर्व शाखांच्या कामाचा आढावा घेवून मुद्रांक तपासणी व सुरक्षा कक्षाची पाहणी केली. त्यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच मार्च अखेरचे सर्व व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी विविध सूचना दिल्या. जिल्ह्यातील कोणत्याही विभागाचे अनुदान परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.