भरधाव वाहन पलटी झाल्याने ११ जण जखमी, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:20 PM2020-05-11T21:20:12+5:302020-05-11T21:20:38+5:30
गोराणे शिवार : जीवितहानी टळली
धुळे : धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने जाणारे वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर चढून खोल असलेल्या चारीत पलटी झाले़ या अपघातात ११ जणांना दुखापत झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली़ ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ नरडाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखत असताना मजुरांना त्यांच्या गावी घेऊन जाण्याची कसरत करावी लागत आहे़ अशातच एक वाहन धुळ्याकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते़ शिंदखेडा तालुक्यातील गोराणे गावाच्या शिवारात हे वाहन आल्यानंतर भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले़ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालविले जात असल्यामुळे वाहनाने अगोदर दुभाजकावर आदळले़ वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट खोल चारीत जावून कोसळले़
या अपघातात रईस इकबाल अहमद शेख, अंजुम बेगम शेख, रशिद रईस शेख, आदिल रईस शेख, आफात अहमद शेख, मोहम्मद फैज शेख, महकूज सलिम शेख, कलाम अब्बास शहा, काशिम रईस शेख, तहसिम रईस शेख, मोहम्मद रईस आरिफ शेख यांना दुखापत झाली आहे़ त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात आसिफ अहमद शेख यांनी दिलेल्या माहितीवरुन शनिवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़