धुळे जिल्ह्यातील १२ जि.प. शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 04:28 PM2018-02-22T16:28:38+5:302018-02-22T16:29:33+5:30
जिल्हा परिषद : साक्री तालुक्यातील सात शाळांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळांचे युडायस पूर्ण झाले असून, त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १२ शाळांमध्ये दहा व त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे.
इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खाजगी खास करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झालेले आहे. विशेषत: ग्रामीण भागातील पाडे, तांड्यावर याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यादृष्टीने सर्वच शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापूर्वी जिल्ह्यात केवळ सात शाळांमध्येच १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता शाळांचे युडायस पूर्ण झाले असून, त्यात जिल्हा परिषदेच्या १२ शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्याचे आढळून आले आहे.
साक्री तालुक्यात ७ शाळा
या सात शाळांमध्ये सर्वाधिक शाळा या साक्री तालुक्यातील आहेत. त्यात क्रिश्ननगर, खर्डबारी, केवाडीपाडा, धामदगावठाण, पवारपाडा, मोखापाडा, कुचीविहीर या येथील जि.प.शाळांचा समावेश आहे. तर धुळे तालुक्यात रामनगर, वणीखुर्द, बोरकुंड येथील शाळांचा समावेश आहे. शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी एक-एक शाळेचा समावेश आहे.
शिक्षक दोन, विद्यार्थी मात्र
पाच-सातच
पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या या शाळांसाठी प्रत्येकी दोन-दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होती.
विद्यार्थ्यांचे समायोजन
ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १० पेक्षा कमी आहे, तेथील विद्यार्थ्यांचे एक किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. यापूर्वी चार शाळांमधील विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. मात्र त्यानंतर ही प्रक्रिया थांबलेली असल्याचे शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले.