धुळे जिल्हयातील १२२ शिक्षकांचे होणार इन कॅमेरा समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 06:25 PM2019-06-27T18:25:32+5:302019-06-27T18:26:17+5:30
जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी करणार मार्गदर्शन
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हांतर्गत बदलीने विस्थापित झालेले तसेच २०१७ मध्ये न्यायालयात गेलेले, २०१८ मधील रॅन्डम राऊंड ५ व सहा मधील जवळपास १२२ शिक्षकांचे शुक्रवारी इन कॅमेरा समुपदेशन करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली.
२०१९ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नुकत्याच जिल्हांतर्गत बदल्या झाल्या. त्यात ५५ शिक्षक विस्थापित झाले आहेत.
त्याचबरोबर २०१८ मध्ये रॅन्डम राऊंडमधील ५ व सहा मधील विस्थापित शिक्षक, त्याचबरोबर २०१७ मधील काही विस्थापित शिक्षकांचे एकाच दिवशी समुपदेशन करण्यात येणार आहे.
२८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण सभापती नूतन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., व शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या उपस्थितीत ही समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन मनीष पवार यांनी केलेले आहे.