नकाणे तलावात १२८ एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:29 PM2019-04-10T21:29:17+5:302019-04-10T21:29:59+5:30
जूनपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे योग्य नियोजनाचे आव्हान
धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात सध्या केवळ १३५ एमसीएफटी जलसाठा शिल्लक आहे. तो केवळ एक ते दीड महिने पुरेल़ तोपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास शहराला जुन महिन्यात टंचाईचा सामना करावा लागू शकतो़. उपलब्ध जलसाठयातील पाण्याची नासाडी न करता शहरात जूनपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे योग्य नियोजनाचे आव्हान प्रशासनासमोर आहे़
गेल्यावेळेस पाऊस कमी झाल्याने नकाणे तलाव भरण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाटचारीतून पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाण्याचे वेगात बाष्पीभवन होत असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे़
गळती थांबविण्याचे आव्हान
नकाणे तलावातून शहराला तसेच वलवाडी, महिंदळे गावांना देखील पाणी पुरविले जाते़ मात्र दिवसेंदिवस जलसाठा घटत चालला आहे़ त्यामुळे महापालिका प्रशासनासमोर पाण्याचे नियोजन व गळतीतून होणारी पाण्याची नासाडी थांबविणे हे प्रमुख आव्हान आहे़
तापी पाणीपुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात सध्या पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातही काही प्रभागात आठ ते दहा दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.