13 भावंडांना वयाच्या साठीनंतरही एकमेकांचा लळा
By admin | Published: May 7, 2017 05:03 PM2017-05-07T17:03:01+5:302017-05-07T17:34:16+5:30
कुसुंबा : पूर्णत: निव्र्यसनी कुटुंब, बहिणीच्या पंच्याहत्तरीला सर्वाची हजेरी
Next
ऑनलाईन लोकमत विशेष /रणजित शिंदे
कुसुंबा, जि. धुळे, दि.7 - अलीकडे एकदा लग्न झालं की मुले आपल्या आई-वडिलांना, भाऊ-बहिणींना विसरून जातात. परंतु वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतरही सख्ख्या 13 भाऊ-बहिणींना एकमेकांशी लळा कायम असल्याचे धुळे येथील कुसुंबा येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिसून आले. या वयाच्या साठी पार केलेल्या 13 भावंडांनी एकत्र येत केसरताई बारीकराव शिंदे या बहिणीची वयाची पंचाहत्तरी अगदी धुमधडाक्यात साजरी केली.
या उत्साहात कुटुंबातील सर्वात थोरली 84 वर्षाची बहिणही सहभागी झाली होती. नुकतेच 5 मे रोजी कुसुंबा येथील गल्ली नं.3 मध्ये केसरताईच्या घरी एकाचवेळी उपस्थित होते. सर्वानी एकत्र येऊन पंचाहत्तरी साजरी करत आंब्याचा रस आणि पुरणपोळीच्या जेवणाचा आनंदही लूटला.
यावेळी माहेरवासीन द्वारकाबाई उत्तम भामरे (वय.84, कापडणे), जावतराबाई शांतीलाल भदाणे (वय 73, निमखेडी), जिजाबाई भाऊराव नेरपगार (वय 71, बहाळ), वत्सलाबाई माणिक देसले (वय 69, वैजाली), विमलबाई गुणवंत पंडित (वय 67, दहिगाव), कमलबाई मधुकर शिरसाठ (वय 61), सुमनबाई रमेश निकम (वय 58, बोराडी), वावडे येथील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंढरीनाथ दगडू ठाकरे (82), रघुनाथ ठाकरे (80), एकनाथ ठाकरे (72), सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी धनराज ठाकरे (65), उपप्राचार्य सुरेश दगडू ठाकरे ही तेराही भावंडे उपस्थित होती. यांच्यासह मुली, जावई, नातू, सूना, नातेवाईकही उपस्थित होते.
पूर्ण कुटुंब निव्र्यसनी
केसरताईंचे वडिल दगडू झुगरू ठाकरे हे वावडे (ता.अमळनेर, जि.जळगाव) जिल्ह्याचे होते. त्यांनी वावडे गावाचे 15 वर्ष सरपंच पद भूषविले होते. त्यांच्या पत्नी कासूबाई दगडू ठाकरे यांनी मुलांना व्यवस्थित संस्कार देऊन संगोपन केले. दोघेही सध्या हयात नाहीत. हे संस्कारीत कुटुंब पूर्णत: निव्र्यसनी आहे. तसेच सर्व नातू, नात हे उच्च शिक्षित व उच्च पदावर आहेत. पंचक्रोषित त्यांची आदर्श परिवार म्हणून गणना केली जाते.
आम्ही पूर्वीपासूनच एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. वयाचे साठ वर्ष पूर्ण केल्यानंतरही सर्वाचे आरोग्य ठणठणीत आहे. लहानपणापासून एकमेकांना असलेल्या लळा कायम ठेवण्यात आला आहे.
-केसरताई शिंदे, कुसुंबा