जिल्ह्यात वर्षभरात सायबर क्राईमचे १५ गुन्हे!
By admin | Published: February 23, 2017 12:25 AM2017-02-23T00:25:40+5:302017-02-23T00:25:40+5:30
धुळे : बदलत्या काळात फसवणुकीची माध्यमेही बदलत असून, त्यासाठी आता इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.
धुळे : बदलत्या काळात फसवणुकीची माध्यमेही बदलत असून, त्यासाठी आता इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. मोबाइलद्वारे बँक खात्याची माहिती घेऊन लुबाडणूक होण्याबरोबरच आता फेसबुक व व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून मुली व महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी असे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१५ मध्ये सायबर क्राईमचे १० गुन्हे दाखल होते़
क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे फसवणूक, फेसबुकवर अश्लील फोटो किंवा पोस्ट टाकणे, तरुणींची, महापुरुषांची बदनामी करणे, मोबाइलवरून त्रास देणे, आॅनलाइन फसवणूक अशा घटना वाढल्या आहेत़ त्यामुळे सायबर गुन्हे हा आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे.
फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप यासारखी संपर्काची अनेक माध्यमे आहेत. जिल्ह्यात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, आता त्याचा गैरवापर वाढू लागला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात मोबाइलद्वारे बँक खात्याबाबत माहिती घेऊन फसवणुकीसह फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दुसºयाला त्रास देणे, बदनामीबाबतचे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१५ मध्ये सायबर क्राईमचे १० गुन्हे दाखल झाले होते़ त्यामुळे गेल्या वर्षी सायबरच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते़ दरम्यान सायबर सेल हा विभाग आता वेगळा झाला असल्यामुळे अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
काय करावे, काय करू नये
सोशल मीडियातून वाढणाºया गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे काळाची गरज बनली आहे. फेसबुकवर खाते बनविताना ते कोणी पाहू नये, असे सेटिंग करून घेणे आवश्यक आहे. फेसबुकवर अनोळखी व्यक्तीला आपला मित्र बनवणे टाळणे गरजेचे आहे. अनोळखी लोकांकडून आपल्या खासगी फोटो व व्हिडिओंचा गैरवापर केला जाऊ शकतो. तसेच मोबाइलवर फोन करून काही बतावणी करून कोणी आपल्या बँक खात्याची माहिती मागत असेल तर ती देऊ नये़
३ ते ५ वर्षांची शिक्षा
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ तयार करणे, कोणीतरी अपलोड केलेला मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे, लाईक करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
याबद्दल माहिती तंत्रज्ञान, भारतीय दंडविधान संहितेत ३ ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.