अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र पुरस्कार सोहळ्यासाठी खान्देशातून १५० बसेस मुंबईला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 08:25 PM2023-04-15T20:25:00+5:302023-04-15T20:51:05+5:30
यामध्ये सर्वाधिक ९९ बसेस या जळगाव विभागातील असल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले.
धुळे : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर झाला असून, १६ एप्रिल रोजी मुंबईतील खारघरमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या पुरस्कारासाठी राज्यभरातtन 'श्रीसदस्य' मुंबईला रवाना होत असून, शनिवारी सायंकाळी खान्देशातील १५० बसेस मुंबईला रवाना झाल्या. यामध्ये सर्वाधिक ९९ बसेस या जळगाव विभागातील असल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते दिला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील `श्री `सदस्यांना निमंत्रित होण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक महिला व पुरूष भाविक मुंबईकडे रवाना होत आहे. यात काही `श्रीसदस्य` हे एसटी महामंडळाच्या बसेसने मुंबईकडे रवाना झाले तर काही सदस्य हे खासगी वाहन व रेल्वेने मुंबईकडे रवाना होतांना दिसून आले.
या कार्यक्रमासाठी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातुन ५० हजार `श्रीसदस्य` सहभागी होणार असल्याची माहिती श्री सदस्यांनी दिली. तर या कार्यक्रमाला राज्यभरातुन २० लाखांपेक्षा अधिक श्रीसदस्य उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येक `श्रीसदस्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण दिसून आले.
एसटी महामंडळाला ७० लाखांची कमाई..
या कार्यक्रमासाठी जळगावसह धुळे व नंदुरबार विभागातुन सुमारे १५० बसेस श्रीसदस्यांतर्फे बुकिंग करण्यात आल्या होत्या. शनिवारी सायंकाळी या बसेस मुंबईकडे रवाना झाल्या. यामुळे महामंडळाच्या तिजोरीत ७० लाखांचे उत्पन्न जमा झाले असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. मुंबईतील कार्यक्रम आटोपुन या बसेस सोमवारी सकाळपर्यंत परतणार आहेत.