१६ हजार मतदारांची नव्याने नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 10:56 AM2017-08-05T10:56:36+5:302017-08-05T10:58:03+5:30
युवा मतदार नोंदणी मोहीम : ३१ आॅगस्टपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मुदतवाढ
आॅनलाईन न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा निवडणूक शाखेतर्फे नवीन मतदारांच्या नाव नोंदणीसाठी जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात तब्बल १६ हजार ८१५ मतदारांची नव्याने मतदार यादीत नोंदणी झाली आहे. दरम्यान, या मोहिमेला धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मुख्य निवडणूक शाखेतर्फे ही मोहीम ३१ आॅगस्टपर्यंत सुरू ठेवावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
मतदान हे राष्टÑीय कर्तव्य आहे. त्यापार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याउद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत प्राप्त झालेल्या आदेशानुसार १ जुलैपासून मतदार नोंदणी अभियानास धुळे जिल्ह्यात सुरुवात झाली होती.
महाविद्यालयांमध्ये जनजागृती
तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेतर्फे जिल्हाभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत नवीन मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली होती.
शिंदखेडा तालुक्यात तरुणांचा प्रतिसाद
शिंदखेडा तालुक्यातील १८ ते १९ वयोगटांतील २ हजार १२९ तरुणांनी या विशेष मोहिमेंतर्गत मतदार यादीत नोंदणी करून घेतली. तर साक्री तालुक्यात १३२०, धुळे ग्रामीणमध्ये १४४६, धुळे शहर १२९१ व शिरपूर तालुक्यात १ हजार ६२ तरुणांनी त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवून घेतले आहे.