धुळे जिल्ह्यातील 164 गावांना अद्याप टंचाईच्या झळा!
By admin | Published: May 27, 2017 06:04 PM2017-05-27T18:04:18+5:302017-05-27T18:04:18+5:30
जिल्ह्यातील सद्यस्थिती : 18 गावांना 14 टॅँकरद्वारे, 119 गावांना खाजगी विहिरी, हातपंपाद्वारे पाणीपुरवठा
Next
>ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.27 - पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून टंचाईच्या शेवटच्या टप्प्यात अद्याप सुमारे 164 गावांना टंचाईची झळ सोसावी लागत आहे. यापैकी 18 गावांना 14 टॅँकरद्वारे, 108 गावांना खाजगी विहिरी अधिग्रहित करून, 17 गावांना तात्पुरत्या योजना आणि 11 गावांना विंधन विहिरींवर हातपंप बसवून पाणीपुरवठा केला जात आहे. शेवटच्या टप्प्यात टंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता असून जून महिन्यात अजून 10 गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
17 गावांसाठी टॅँकर सुरू
जिल्ह्यात शिरपूर वगळता धुळे, साक्री व शिंदखेडा या तीन तालुक्यांमधील 17 गावांसाठी सध्या 14 टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात धुळे तालुक्यातील तांडा कुंडाणे व कुंडाणे (वे.), अजंग आणि साक्री तालुक्यातील सालटेक व कढरे या 4 गावांसाठी स्वतंत्र टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक 13 गावांसाठी 10 टॅँकर सुरू आहेत. त्यात दत्ताणे व अजंदे गावांसाठी एक, मेलाणे व विटाई गावांसाठी एक आणि दाबली व धांदरणे गावांसाठी एक टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या शिवाय वारूड, पथारे, भडणे, तामथरे, चांदगड, वरूळ घुसरे व चुडाणे आदी गावांना स्वतंत्र टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 14 टॅँकरमध्ये दोन खाजगी टॅँकर्सचा समावेश आहे.
119 गावांना खाजगी विहिरींचा ‘आधार’
जिल्ह्यात धुळे तालुक्यात नवलाणे, आर्णि, बेहेड, नावरा, धमाणे, चिंचवार, आंबोडे, वडगाव व धाडरा या 8 गावांसाठी खाजगी विहीर व नावरी, धमाणे या 2 गावांसाठी विंधनविहीर (बोअर) अधिग्रहित करण्यात आली आहे.
साक्री तालुक्यात 27 गावांसाठी खाजगी विहीर तर 5 गावांसाठी विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे.
शिंदखेडा तालुक्यात 47 गावांसाठी खाजगी विहीर तर 15 गावांसाठी खाजगी विंधनविहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे. शिरपूर तालुक्यात ङोंडेअंजन, नटवाडे (खोलचौकी) या 2 गावांना खाजगी विहीर तर पारशीपाड व अंबडपाडा (वरझडी) येथे खाजगी विंधन विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे.
तात्पुरत्या योजना; 19 गावांना दिलासा
जिल्ह्यात 19 गावांना तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 17 पूर्ण झाल्या असून दोन प्रगतीपथावर आहेत. 19 योजनांपैकी साक्री तालुक्यातील शिरसोले व फोफरे वगळता सर्व योजना पूर्ण होऊन त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
सर्व 11 बोअर यशस्वी
कृती आराखडय़ांतर्गत उपाययोजना म्हणून प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या 11 ठिकाणी विंधनविहिरी (बोअर) यशस्वी झाल्या. तेथे हातपंप बसविण्यात आल्याने ग्रामस्थांना पाणी मिळत आहे. साक्री तालुक्यातील ककाणी व शेवाळी येथे विहीर खोल करण्याच्या उपाययोजनेस 11 मे रोजी मान्यता देण्यात आली असून काम प्रगतीपथावर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.