१७ दिवसातच खुनाचे संशयित आरोपी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:40 PM2018-08-18T22:40:55+5:302018-08-18T22:42:08+5:30
अजय कोळी खून प्रकरण : ठोस पुरावा नसताना पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/सोनगीर/शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील चांदगड येथील अजय कोळी या तरुणाच्या खून प्रकरणी सोनगीर येथील दोन संशयितांना ठोस पुरावा नसतानाही १७ दिवसात जेरबंद करण्यात नरडाणा पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे, याचा तपास केला जाईल़
शिंदखेडा तालुक्यातील चांदगड येथील अजय उत्तम कोळी (१८) हा तरुण ३१ जुलै रोजी एमएच १८ बीएफ ८९६५ या क्रमांकाच्या दुचाकीने मोबाईल दुरुस्तीसाठी सोनगीरला आला होता़ गावातीलच एकाला सोबत घेऊन त्या तरुणाने सीम कार्डसह मोबाईल दुरुस्तीला दिला़ त्यानंतर सोनगीर फाट्यावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरले़ त्याने त्याच्या मित्राला सोडले आणि घरी निघाला़ मात्र, तो घरी पोहचलाच नाही़ त्यामुळे त्याचा भाऊ जिगर कोळीसह नातलगांनी त्याचा शोध घेतला़ तो सापडत नसल्याने अखेरीस ४ रोजी दुचाकीसह भाऊ बेपत्ता झाल्याची माहिती सोनगीर पोलिसांना देण्यात आली़
शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा रस्तालगत वाघाडी गावाच्या शिवारात वन हद्दीत दुर्गंधी येत असल्याची माहिती एका वन मजुराने सोनगीर पोलिसांना दिली होती़ सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी तरुणाच्या मृतदेहावर टाकण्यात आलेले दगड बाजुला करुन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला़ सुरुवातीला हे पार्थीव अनोळखी वाटत होते़ परंतु त्याच्याजवळ मिळालेला फोटो आणि कागदपत्रावरुन हरविलेला तरुण अजय कोळीच असल्याचे उघड झाले़ त्यानंतर पोलिसांनी त्याचा भाऊ जिगर कोळी याला बोलावून अजय कोळीची ओळख पटविली होती़ नरडाणा पोलिसात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नसताना अवघ्या १७ दिवसात खुनाचा तपास लावण्यात आला़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली़
यांना घेतले ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार नरडाणा पोलिसांची वेगवेगळी दोन पथके तयार करण्यात आली होती़ या पथकाने सोनगीर, वाघाडी, वालखेडा, चांदगड, वायपूर, सार्वे, मुडी-मांडळ, एमआयडीसी नरडाणा अशा विविध ठिकाणी फिरून मयत तरुणाच्या नातेवाईकांसह मित्रांशी संपर्क साधला़ त्यातून जे संशयित वाटले त्यांच्यावर पाळत ठेवली आणि सोनगीर येथील सुनील भिवसन ठाकरे (२०) आणि त्याचा मित्र विजय आबा भिल (२२) रा़ एकलव्य चौक, सोनगीर या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या या पथकाला यश आले़
असा आहे घटनाक्रम
३१ जुलैपासून अजय कोळी हा बेपत्ता होता़ सोनगीर पोलीस स्टेशनला ४ आॅगस्टला हरविल्याची नोंद करण्यात आली होती़ ५ आॅगस्ट रोजी वाघाडी खुर्द शिवारात त्याचा मृतदेह आढळला़ १८ आॅगस्ट रोजी दोन संशयितांना त्यांच्या घरातून जेरबंद केले़
यांना रोख पुरस्कार
माहितीच्या आधारावर दोघां संशयितांपर्यंत पोहचल्याबद्दल पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांचे कौतूक केले़ विनोद पाटील यांना १ हजार रुपयांचे बक्षिस, प्रशस्तीपत्रक आणि संदिप गावित यांनाही प्रशस्तीपत्रक जाहीर केले़ याशिवाय हेड कॉन्स्टेबल प्रकाश माळी आणि काशिनाथ ठाकरे यांना प्रत्येकी २ हजार रुपये आणि पारीतोषिक जाहीर करण्यात आले़ यासोबतच पथकातील रघुनाथ शिंदे, नागराज महाजन, सचिन सोनवणे, सचिन माळी, शशिकांत कोळी, मनोज बागुल, रामलाल अहिरे यांना प्रत्येकी ५०० रुपये देण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले़