‘शिरपूर पॅटर्न’चे २०० बंधारे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 07:20 PM2020-09-18T19:20:18+5:302020-09-18T19:20:54+5:30

जलक्रांतीचे दुसरे पर्व : बारमाही शेतीबरोबर आता मत्स रोजगाराकडे लक्ष

200 dams of 'Shirpur pattern' overflow | ‘शिरपूर पॅटर्न’चे २०० बंधारे ओव्हरफ्लो

dhule

googlenewsNext


सुनील साळुंखे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : या तालुक्यात सरासरीच्या १२१ टक्के पाऊस होवूनही अद्यापही बहुतांशी बंधारे पाण्याने भरलेली नाहीत़ मात्र ‘शिरपूर पॅटर्न’ अंतर्गत बांधण्यात आलेले २४० पैकी २०० बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत़ माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या दुरदृष्टीतून हा तालुका सुजलाम-सुफलाम होत असतांना त्यासोबत शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता येत आहेत़ तसेच आदिवासींना देखील रोजगार मिळावा म्हणून त्या बंधाºयात मत्स बीज टाकून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे़
माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी १७ वर्षापूर्वीच जलक्रांतीचा ‘शिरपूर पॅटर्न’ राबविला़ तालुका आज त्याची फळे चाखत आहे़ संपूर्ण देशात या पॅटर्नची चर्चा आहे़
पारंपरिक जलस्त्रोतांचा विचार करता नाले, विहिरी यांच्याकडे लक्ष केंद्रीत होते़ विहिर पुनर्भरण अथवा विहिरींची पाणी पातळी वाढवणे हे उपाय पाणी टंचाईवर करणे अपेक्षित आहे़ ‘शिरपूर पॅटर्न’चे हेच ध्येयसूत्र आहे़ विहिरींची जलपातळी वाढवणे, जमिनीखालील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अथवा वाढवणे यासाठी बारमाही नाले वाहते ठेवणे आवश्यक आहे़
हा मूलभूत सिध्दांत भूजल वैज्ञानिक दिनेश जोशी यांनी शिरपूर परिसरात प्रात्यक्षिकरूपात सिद्ध करून दाखवला, यालाच आधुनिक जलक्रांती अर्थात शिरपूर ‘जलसंधारण पॅटर्न’ म्हणतात़
या पॅटर्न अंतर्गत पारंपरिक नाले अधिक खोल करणे, अधिक रूंद करणे, नाल्यांची साखळी तयार करणे, वरच्या नाल्याचे अतिरिक्त पाणी खालच्या नाल्यात पोहोचवणे, पाणी अडवण्यासाठी या नाल्यांवर सिमेंटचे बंधारे बांधणे, नाल्यात साठलेल्या पाण्यात मत्स्यबीज सोडून मासेमारी व्यवसायाला चालना देणे, नाल्यात साठवलेले पाणी पंपाद्वारे स्थानिक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात पोहोचवणे, बारमाही वाहत्या साखळी नाल्यांमुळे परिसरातील भूजल पातळी वाढणे आदी या सर्वांचा दृश्य व एकत्रित परिणाम म्हणून पिकवृध्दी, उत्पादन वाढ होणे तसेच बळीराजाच्या उत्पन्नात वाढ होवून त्याचा जीवनस्तर उंचावणे हे या ‘शिरपूर पॅटर्न’चे फलित आहे़ शिरपूर जलसंधारण पॅटर्नची तांत्रिक बाजू तितकीच महत्त्वाची आहे़ यात भूजल विज्ञानातले तंत्र वापरण्यात आले आहे़
प्राथमिक स्तरावर परिसरातला पर्जन्यकाळ, पावसाचे प्रमाण, मृदेचा दर्जा, शेतकºयांची मानसिकता यांचा अभ्यास सुरेश खानापूरकरांनी केला़ दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टीने तीन वर्षाचे पाणी साठविण्याचे उद्दिष्ठ ठेवले़ त्यानुसार लहान नाल्यांवर छोटे परंतु साठवण क्षमता अधिक असलेले बंधारे बांधले़ त्यात तीन वर्षाचे पाणी साठविले़
आपल्याकडच्या जमिनीत डेक्कन बेसॉल्टचे फॉर्मेशन आहे़ त्यात मुरूम व नंतर दगड असे ३५ पेक्षा जास्त थर आहेत़ मुरूमाच्या स्तरांची जाडी व घनता कमी आहे़ त्यांची साठवण क्षमता २५ टक्के आहे़ म्हणजेच हे थर केवळ १०० घनफूट पाणी धरून ठेवू शकतात़ यापेक्षा जास्त पाणी ते धरून ठेऊ शकत नसल्यामुळे, शिवाय दगडांचे खाली वर थर असल्यानेही जास्त पाणी हे मुरूमांचे स्तर धरून ठेऊ शकत नाही़ त्यामुळे पाण्याचा मुबलक साठा होत नाही़ ही जमिनीखालील प्रतिकूलता असली तरी याच प्रतिकूलतेचा अनुकूल वापरही करता येऊ शकेल ही अभिनव कल्पना ज्या दिवशी सूचली त्याच दिवशी खरे तर ‘शिरपूर पॅटर्न’चा जन्म झाला़
परिसरातील उथळ व कडक नाले आधी खोल केले़ त्यातून निघालेले काळ्या व पिवळ्या मातीचे थर बाजूला टाकले, वाळू काढली़ दगड फोडून काढले़
मुरूमाच्या थरावर ३० ते ३५ फूट पाण्याचा साठा बंधारे बांधून केला़ हायड्रोस्टॅटिक प्रेशर दगडातला पाणी वाहण्याचा वेग वाढवितो म्हणून हा प्रेशर तयार होण्यासाठी नाले खोल केले़
आतापर्यंत तालुक्यात या पॅटर्न पध्दतीनुसार २४० बंधारे बांधले गेले आहेत़ तालुक्याच्या पलिकडे शिंदखेडा परिसरातही शिरपूर जलसंधारणाचा धरतीवरील अनेक बंधारे बांधले गेले आहेत़ शेकडो एकर जमीन या पॅटर्ननुसार जलसिंचनाच्या क्षेत्रात आली आहे़
एक बंधारा कोट्यवधी लिटर पाणी साठवतो़ या पाणी साठ्यामुळे बंधाºयाच्या परिसरातील अर्ध्या किमी पर्यंत पाणी मुरत जाते़ परिणाम स्वरूप विहिरींची जलपातळी वाढली़
या पॅटर्नची वैशिष्टये अशी आहेत की, या पॅटर्नमुळे विस्थापन होत नाही, कुणाचे पुनर्वसन करावे लागत नाही़ भू-संपादन करावे लागत नाही़ पर्यावरणाची हानी न होता जलसंधारणाचे कार्य घडते़ बळीराजाच्या उत्पन्नात कुठलाही अतिरिक्त खर्च न करता वाढ होवून त्यांचे जीवनमान उंचावते म्हणूनच ज्या-ज्या विभागांनी शिरपूर जलक्रांतीला दीपस्तंभ मानून या पॅटर्नचा अवलंब केला त्या भागात शेतकरी आत्महत्येची चर्चा ऐकवयास येत नाही़

Web Title: 200 dams of 'Shirpur pattern' overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.