२०० विद्यार्थ्यांनी केला परिसर स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 03:35 PM2017-10-01T15:35:15+5:302017-10-01T15:36:40+5:30
मनपातर्फे स्वच्छता मोहीम : अधिकारी, पदाधिकारी व सिनेतारीका दीपाली आंबेकर यांनी केले श्रमदान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपातर्फे ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत रविवारी सकाळी शहरातील शिवतीर्थ चौक परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेंतर्गत मनपा प्रशासनाने केलेल्या आव्हानानुसार शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत दीड ते दोन टन कचरा संकलित करून येथील परिसर स्वच्छ केला.
रविवारी सकाळी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यापूर्वी शिवतीर्थ चौकातील अब्दुल हमीद यांच्या पुतळ्याला पाण्याने धुवून काढत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी महापौर कल्पना महाले, सिनेतारका दीपाली आंबेकर, नगरसेविका प्रतिभा चौधरी, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, स्वच्छता निरीक्षक रत्नाकर माळी, महेंद्र शिरपूरकर, एन. के. बागुल व स्वच्छता विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उत्स्फूर्त प्रतिसाद
मनपातर्फे रविवारी राबविण्यात येणारी व्यापक स्वच्छता मोहीमेच्या यशस्वीतेसाठी शुक्रवारी शहरातील २०० प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच ११ महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली होती. यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारीदेखील उपस्थित होते.
अडीच तास काढला घाम
सकाळी साडे सात वाजता या मोहीमेला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी दहा वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम सुरू होती. यात सहभागी विविध शाळेतील एन.सी.सी. स्काऊट गाईडच्या विद्यार्थी, अधिकारी व पदाधिकाºयांनी घाम गाळत शिवतीर्थ चौक ते सिद्धेश्वर गणपती मंदिर, शिवतीर्थ चौक ते महावितरण कंपनीचे कार्यालय (साक्री रोड), शिवतीर्थ चौक ते कल्याण भवन व तसेच शिवतीर्थ चौक ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंतचा परिसर स्वच्छ केल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक रत्नाकर माळी यांनी दिली.