धुळ्यात २०० प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; सायंकाळी जेवणानंतर मैदानावर जाताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 08:19 AM2024-03-15T08:19:30+5:302024-03-15T08:20:11+5:30
धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे.
धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे 100 ते 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुमारे 200 जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्रीच्या जेवणानंतर मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे 100 हून अधिक जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांनी दिली आहे.
धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुरुवारी सायंकाळी या जवानांना मेस मधून जेवण देण्यात आले होते. जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलीस जवान हजर झाले. मात्र रोल कॉल सुरू होताच यातील बहुसंख्य जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. या जवानांनी मैदानावरच उलटी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला. जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचे जाणवल्याने धावपळ उडाली. तातडीने जास्तीचा त्रास होत असलेल्या जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या पोलिसांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अचानक मोठ्या प्रमाणावर मळमळ आणि उलटीचा त्रास होत असलेले जवान दाखल झाल्याने त्या ठिकाणी देखील गोंधळाची स्थिती निर्माण झाली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करून स्थिती नियंत्रणात ठेवली. या जवानांमधील सुमारे आठ जणांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर देखील तातडीचे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर सय्याजी भामरे यांनी दिली आहे.
दरम्यान जवानांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्याने धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. या विषबाधा प्रकरणाची पोलिस अधीक्षक धुळे यांनी देखील पुष्टी केली आहे.