धुळे जिल्ह्यातील २३ जि.प.शाळा अवघड क्षेत्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:27 PM2018-04-26T15:27:32+5:302018-04-26T15:27:32+5:30
साक्री तालुक्यातील एकाही गावाचा अवघड क्षेत्रात समावेश नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या संदर्भात सध्या शिक्षण विभागामध्ये तयारी सुरू आहे. अवघड गावे निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात २३ गावातील जि.प.शाळांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यात आलेला आहे. यात शिरपूर तालुक्यातील १४, धुळे तालुक्यातील ६, व शिंदखेडा तालुक्यातील ३ गावातील जि.प.शाळांचा समावेश आहे. साक्री तालुक्यात एकही गाव अवघड क्षेत्रात नाही.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी शिक्षण विभागाने आता सर्वसाधारणक्षेत्र व अवघड क्षेत्र अशी वर्गवारी केलेली आहे.
धुळे जिल्ह्यात ११०३ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यात ३५८६ शिक्षक कार्यरत आहे. अवघड क्षेत्रातील काही गावे दुर्गम क्षेत्रात असून, या ठिकाणी बसची जाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे शिक्षकांना पायीच जावे लागते.
अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी शिक्षण विभागाची नुकतीच बैठक झाली. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकाºयांना, अभियंता यांना सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना केल्या. झालेल्या सर्वेक्षणानुसार अवघड क्षेत्रातील गावांची यादी चारही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाºयांनी शिक्षण विभागाला सादर केली. त्यात २३ गावांचा समावेश केला आहे. गेल्यावर्षीही २३ गावांचाच अवघड क्षेत्रात समावेश झालेला होता.
या गावातील जि.प.शाळांचा अवघड क्षेत्रात समावेश
शिरपूर तालुका- गधडदेव, मालकातर, उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, गुºहाळपाणी, निशानपाणी, रोहीणी, जि.प.शाळा टिटवापाणी चिलारे, जि.प.शाळा खुटमळी चिलारे, जि.प.शाळा पिरपाणी चिलारे, जि.प.शाळा कोईडोकीपाडा सावेर, महादेव-दोंडवाडे.
धुळे तालुका- जि.प.शाळा कुसुंबा भिलाली, जि.प.शाळा हिंगणे, जि.प.शाळा बोरीकाठ, जि.प.शाळा रामनगर, जि.प.शाळा मुळप्रतिपाडा, जि.प.शाळा वैतागवाडी-पिंपरखेड. तर शिंदखेडा तालुक्यात देवकानगर, होळकरवाडी, पावसानगर येथील जि.प.शाळांचा समावेश आहे.
दरम्यान साक्री तालुक्यातील एकाही जि.प.शाळेचा अवघड क्षेत्रात समावेश नाही.
पुरूषांनाच मिळणार अवघड शाळा
दरम्यान पुरूष शिक्षकांना या अवघड क्षेत्रातील शाळा मिळणार आहे. महिला शिक्षिकेला अवघड शाळा क्षेत्रातून वगळण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
अवघड क्षेत्रात काम करण्याकडे कल
अवघड क्षेत्रातील गावे मुख्यालयापासून दूर असून दुर्गम भागात आहेत. काही गावातील परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे त्याठिकाणी शिक्षक जायला तयार नसतात. असे असले तरी अशा गावातील शाळांमध्ये विशेष कामगिरी करू असा काही शिक्षकांना विश्वास असतो. त्यामुळे ते अवघड क्षेत्रातील शाळांची मागणी करीत असतात.