२४० घरकुले चार वर्षांपासून रिकामी !
By admin | Published: July 14, 2017 11:43 PM2017-07-14T23:43:38+5:302017-07-14T23:43:38+5:30
महापालिका : लाभार्थी आपला हिस्सा देण्याबाबत उदासीन असल्याने घरकुले बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाने घरकूल योजना महापालिकेच्या स्तरावर राबविण्यास सुरुवात केली़ एकूण ३६० पैकी २४० घरकुले चार वर्षांपासून बांधून तयार आहेत़ पण, लाभार्थींचा हिस्सा अद्याप मिळाला नसल्याने घरकूल अद्याप वाटप झालेले नाही़ कोट्यवधीची मालमत्ता अक्षरश: बेवारस स्थितीत असल्याचे समोर येत आहे़
मनपा हद्दीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी सुरुवातीपासून महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झालेले आहेत़ त्यात शासनाकडून यासाठी वेळोवेळी पाठपुरावादेखील करण्यात आलेला आहे़ शहरातील जुने धुळे भागातील नवी भिलाटी भागात घरकूल बांधण्यासाठी महापालिकेने जागा निश्चित केलेली आहे़ त्यात ३६० घरांची रचना होणार असून पैकी २४० घरे बांधून तयार आहेत़ त्यात एक रूम, किचन, शौचालय, बाथरूम अशी रचनादेखील तयार करण्यात आलेली आहे़ या प्रत्येक घरासाठी शासनाकडून १ लाख २५ हजारांचा खर्च झालेला आहे़ यात लाभार्थींचा हिस्सा ११ हजार रुपये देण्यात आलेला आहे़ लाभार्थींचा हिस्सा जोपर्यंत महापालिकेकडे जमा होत नाही, तोपर्यंत संबंधितांना घरकुलांचा लाभ मिळू शकत नसल्याचे महापालिकेचे ओव्हरसियर चंद्रकांत उगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ गरीब गरजू लोकांना घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत असताना मात्र नागरिकांकडूनच त्याला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे यातून उजेडात आलेले आहे़ लवकरात लवकर लाभार्थींनी आपल्याकडील हिस्सा महापालिकेकडे वर्ग केल्यास त्यांना घरकुलांचा लाभ मिळू शकतो़
योजना गुंडाळण्याच्या स्थितीत
गेल्या चार वर्षांपासून घरकुलाचे काम मार्गी लावण्यात आले असून त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनास्तरावरून खर्ची झालेले आहेत. खºया आणि गरजवंतांना ही घरे राहण्यासाठी दिल्यास हक्काचा निवारा मिळण्यास मोठी मदत होईल़ पण, लाभार्थीकडून ११ हजार रुपयांचा हिस्सा देण्यात आलेला नसल्याने लाभार्थींपर्यंत हा लाभ मिळत नाही़ परिणामी योजना गुंडाळण्याच्या स्थितीत आली असल्याचे समोर आले आहे़