उघड्यावर शौचास जाणाऱ्या २५ जणांना केले पोलीसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2017 10:26 PM2017-01-03T22:26:50+5:302017-01-03T22:27:48+5:30
महापालिका प्रशासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 3 - महापालिका प्रशासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ दरम्यान, मंगळवारी पहाटे मनपाच्या पथकांनी विविध भागात उघड्यावर शौचास बसलेल्या २५ जणांना थेट पोलीसांच्या स्वाधीन केले़ अखेर समज दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले असून पोलीसात कारवाईची नोंद करण्यात आली आहे़
स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत २६ जानेवारीला शहर हगणदरीमुक्त घोषित केले जाणार आहे़ त्यानुषंगाने मनपा प्रशासनाकडून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे़ मंगळवारी पहाटे सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सहायक आरोग्याधिकारी रत्नाकर माळी, स्वच्छता निरीक्षक सुरेश महाजन, संदीप मोरे, राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, साईनाथ वाघ यांच्यासह पोलीसांनी मोगलाई परिसर, मोहाडी परिसर, ८० फुटी रोड परिसर, मोठ्या पुलाजवळ उघड्यावर शौचास बसलेल्या २५ जणांवर कारवाई केली़ संबंधितांना पोलीस ठाण्यात नेण्यात येऊन समज देण्यात आल्यानंतर सोडण्यात आले़ प्रत्येक भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना मनपाने यापूर्वी समज दिली होती, गुलाबपुष्प देण्यात आले होते, ढोल वाजवून जनजागृतीचाही प्रयत्न करण्यात आला होता, त्यानंतर अखेर पोलीस ठाण्यात नेण्याची कारवाई करण्यात आली़ संबंधितांना समज देऊन सोडण्यात आले असून पोलीसात या कारवाईची नोंद करण्यात आली आहे़