धुळ्यात ठेकेदाराला घातला २८ लाखांचा गंडा
By देवेंद्र पाठक | Published: March 5, 2023 04:10 PM2023-03-05T16:10:05+5:302023-03-05T16:13:46+5:30
धुळे : अंबुजा कंपनीची सिमेंटची गोणी २५० ऐवजी २३० रुपयाला देऊ, असे आमिष दाखवून एका टप्प्यात २० लाख आणि ...
धुळे : अंबुजा कंपनीची सिमेंटची गोणी २५० ऐवजी २३० रुपयाला देऊ, असे आमिष दाखवून एका टप्प्यात २० लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ७ लाख ६० हजार रुपये घेण्यात आले. परंतु सिमेंटच्या गोण्या मात्र पाठविल्या नाही. यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठेकेदाराने शनिवारी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फसवणुकीचा हा प्रकार २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ या कालावधीत घडला होता.
धुळ्यातील अमेय अपार्टमेंट, अग्रवाल नगरात राहणारे तरुण वसंत गोसर (वय ३५) हे सरकारी ठेकेदार आहेत. अंबुजा सिमेंटसंदर्भात एकाने सोशल मीडियावर ग्रुप तयार करण्यात आला. हा ग्रुप अस्तित्वात नसताना अस्तित्वात असल्याचे भासविण्यात आले. त्यात अंबुजा सिमेंटची २५० रुपयांची एक गोणी आहे. मात्र, सिमेंटची गोणी जास्त प्रमाणात घेणार असल्यामुळे प्रत्येक गोणीमागे २३० रुपयाला देऊ, असे आमिष दाखविण्यात आले. त्याबदल्यात २० लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ७ लाख ६० हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. एवढे पैसे पाठवून सुद्धा वेळेत सिमेंटच्या गोण्या आल्या नाहीत. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला असता त्याच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता.
फसवणुकीचा हा प्रकार मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरात २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान घडला. वारंवार तगादा लावूनही पैसे मिळाले नाही आणि ऑर्डर दिल्याप्रमाणे सिमेंटच्या गोण्याही मिळाल्या नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुण गोसर यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली. त्यानुसार सौरभ त्रिपाठी (वय, पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात शनिवारी सायंकाळी भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक व्ही. टी. पवार घटनेचा तपास करीत आहेत.