नकाणे तलावातून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; प्रांताधिकारी, अपर तहसीलदाराची कारवाई

By देवेंद्र पाठक | Published: November 3, 2023 05:23 PM2023-11-03T17:23:49+5:302023-11-03T17:24:10+5:30

प्रांताधिकारी राहुल जाधव यांनी वाळू माफियांवर कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे.

3 tractors transporting sand from Nakane Lake seized Action of Provincial Officer, Additional Tehsildar | नकाणे तलावातून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; प्रांताधिकारी, अपर तहसीलदाराची कारवाई

नकाणे तलावातून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले; प्रांताधिकारी, अपर तहसीलदाराची कारवाई

धुळे: प्रांताधिकारी राहुल जाधव यांनी वाळू माफियांवर कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. नकाणे तलावातून वाळूची अवैध उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी रात्री अपर तहसीलदार विनोद पाटील आणि त्यांच्या पथकाने केली. प्रांताधिकारी राहुल जाधव आणि अपर तहसीलदार विनोद पाटील यांनी येथील पदभार स्वीकारल्यानंतर अवैध वाळू उत्खनन व अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे.

प्रांताधिकारी यांनी वाळू माफियांविरोधात कारवाई करण्याची सूचना यंत्रणेला दिली आहे. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून ठिकठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली जात आहे. अपर तहसीलदार विनोद पाटील यांनीदेखील कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. मंडळ अधिकारी कमलेश बाविस्कर, मनोहर पाटील, तलाठी प्रमोद पाढेन, शांतीलाल शिरसाट, मृणाल नगराळे, कोतवाल मनोज पाटील यांच्या पथकाला नकाणे तलाव परिसरात गुरुवारी रात्री रवाना करण्यात आले. या पथकाने रात्री अडीच ते तीन किमी अंतर पायी चालून गौणखनिजची होणारी चोरी पकडली. या कारवाईत वाळू वाहतुकीसाठी आणलेले तीन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. जप्त केलेले तीनही ट्रॅक्टर अपर तहसीलदार कार्यालय आवारात आणण्यात आले. या कारवाईत पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती.

दरम्यान, अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात यापुढे अशाच प्रकारची धडक कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी राहुल जाधव आणि अपर तहसीलदार विनोद पाटील यांनी दिली.

Web Title: 3 tractors transporting sand from Nakane Lake seized Action of Provincial Officer, Additional Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.