धुळ्यात पारधी समाजात ३० टक्के बेरोजगारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 09:51 PM2017-12-10T21:51:01+5:302017-12-10T21:53:16+5:30
सर्वेक्षणातून माहिती समोर : विखुरलेल्या समाजाला एकजूट करण्यासाठी आदिवासी पारधी महासंघाचे प्रयत्न
मनीष चंद्रात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धकाधकीच्या जीवनात अतूट नातेसंबंध दुरावत चालले आहे. अशीच काहीशी परिस्थिती पारधी समाजात आहे. त्यामुळे विखुरलेल्या या पारधी समाजातील बांधवांची एकजूट व समाजातील समस्या जाणून घेण्यासाठी आदिवासी महासंघाच्या काही पदाधिकाºयांनी धुळे शहरात पारधी कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात पारधी समाजाची ३११ कुटुंबे व लोकसंख्या ६५० इतकी आढळून आली आहे. मात्र, पारधी समाजात ३० टक्के बेरोजगारी असल्याचे दिसून आले आहे.
व्यवसायाच्या निमित्ताने शहरात दाखल
शहरातील पारधी कुटुंबीयांचे सर्वेक्षण करण्याचे आदिवासी पारधी महासंघाच्या पदाधिकाºयांनी ठरविले. तेव्हा सर्वात प्रथम पारधी समाज शहरात दाखल झाला कसा? या माहितीचा शोध घेण्यात आला. तेव्हा हे पारधी समाज बांधव व्यवसाय किंवा रोजगाराच्या संधीनिमित्ताने जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातून धुळे शहरात दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली.
हलाखीची परिस्थिती, अर्धवट शिक्षण सोडावे लागते
हलाखीची परिस्थिती, कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी नाइलाजाने पारधी समाजातील अनेक तरुणांवर अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ आल्याची वस्तुस्थिती सर्वेक्षणात दिसून आली. परिणामी, समाजातील अनेक तरुण मंडळी हे सेंट्रिंग काम, इलेक्ट्रिक व्यवसाय, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये, तर काही तरुण मुले सुरत येथे कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. अशी परिस्थिती समाजात असली तरीदेखील शहरातील पारधी समाजाच्या २६ मुली व २५ मुलांनी बी.ई.चे शिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित २५ मुले ही पोलीस, एस.आर.पी.एफ, बीएसएफ, सी.आर.पी.एफ. व भारतीय सैन्य दलात भरती झाल्याची सर्वेक्षणातून नोंद झाली आहे.
समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढले
हे सर्वेक्षण करताना पारधी समाजात घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलीला विश्वासात न घेता तिचा विवाह करणे, मुलाच्या आई-वडिलांसाबेत राहायचे नाही, अशा अटी मुली मुलांना देत असल्याने किंवा इतर क्षुल्लक कारणांनी घटस्फोटाचे प्रमाण समाजात वाढत आहे. ही भयावह परिस्थिती विचारात घेता, २४ घटस्फोटीत मुलींच्या नावांची नोंद पुनर्विवाहासाठी आदिवासी पारधी महासंघाने सर्वेक्षणानंतर तयार केलेल्या ‘जीवन साथी’ या पुस्तिकेत घेतली आहे.
समाज बांधवांच्या माहितीची केली पुस्तिका
धुळे शहरात पारधी समाजाचे सर्वेक्षण करण्याचे काम हे अशोक चव्हाण, किशोर चव्हाण, बापू पारधी, रमेश साळुंखे, किरण साळुंखे, नगराज साळुंखे, लक्ष्मण साळुंखे, जगदीश शिंदे, रवींद्र चव्हाण यांनी केले. शहरातील सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर समाज बांधवांची माहिती सर्वांपर्यंत असायला हवी, यासाठी ‘आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबाची ओळख’ व ‘जीवन साथी’ या दोन पुस्तिका तयार केल्या आहेत. पुढील टप्प्यात धुळे जिल्ह्यातही अशाच प्रकारचे सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती आदिवासी पारधी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक चव्हाण व जिल्हाध्यक्ष बापू पारधी यांनी दिली आहे.
आदिवासी पारधी महासंघाने शहरात दोन टप्प्यात सर्वेक्षण केले. पहिला टप्पा हा नगावबारी ते मोहाडी व दुसरा टप्पा हा एसआरपीची वसाहत ते पारोळा चौफुली असा होता. त्यात एसआरपी वसाहत ते पारोळा चौफुलीदरम्यान येणाºया साक्री रोडवर पारधी समाजाची सर्वाधिक घरे असल्याचे आढळून आले आहे.
विखुरलेल्या पारधी समाजाला एकत्र करण्यासाठी हे सर्वेक्षण आम्ही केले. त्यात समाजात अनेक समस्या आढळून आल्या. समाजाच्या प्रगतीसाठी योग्य त्या समुपदेशनाची आज गरज आहे. त्या दृष्टीने येणाºया काळात आम्ही प्रयत्न सुरू ठेवणार आहोत.
-अशोक चव्हाण, राज्य उपाध्यक्ष, आदिवासी पारधी महासंघसर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर दोन पुस्तिका तयार केल्या आहेत. या पुस्तिकेच्या माध्यमातून समाज बांधवांची माहिती समाजात तळागाळापर्यंत पोहचणार आहे. आता पुढील टप्प्यात असेच सर्वेक्षण हे जिल्ह्यात करण्याचे आमचे नियोजन आहे.
-बापू पारधी, अध्यक्ष, जिल्हा आदिवासी पारधी महासंघ