धुळ्यात कांद्याच्या ३० गोण्या आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 10:22 PM2018-10-28T22:22:14+5:302018-10-28T22:26:00+5:30
बाजार समितीतील घटना : व्यापाºयाचा होता माल, आर्थिक फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवण्यात आलेल्या व्यापाºयांच्या कांदा गोणीला अचानक रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली़ आग लागल्याचे कळताच अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ भडकणारी आग तातडीने आटोक्यात आणण्यात यश आले असलेतरी यात ३० गोण्यांमधील कांदा जळून खाक झाला आहे़ सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही़ अंदाजे १० ते १५ हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़
पारोळा रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत धुळ्यासह जवळील तालुका आणि गावांतून शेतमाल मोठ्या प्रमाणात येत असतो़ गुरुवार, शुक्रवारी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली़ साधारणपणे हजार ते पंधराशे रुपयांपर्यंतचा भाग शेतकºयांना देण्यात आला आहे़
व्यापारी मधुकर हरी आणि ओम शेठ या दोन व्यापाºयांचा ३०० गोण्या कांदा शुक्रवारपासून येथील बाजार समितीच्या कांदा शेडमध्ये ठेवलेला होता़ नेहमीप्रमाणे या ठिकाणी वॉचमन देखील कार्यरत होता़ दोन दिवसांपासून सुमारे ३०० कांद्याच्या गोण्यांची थप्पी येथे असताना अचानक रविवारी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास ठेवण्यात आलेल्या गोण्यांच्या ठिकाणाहून धूर दिसून आला़ कांद्याच्या गोण्यांना आग लागली असल्याचा अंदाज घेत तातडीने अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ घटनेची माहिती मिळताच बंब धुळ्याच्या बाजार समितीत दाखल झाला़ पाण्याचा मारा करुन बंबामुळे आग आटोक्यात आली़
याठिकाणी असलेल्या कांद्याच्या गोण्यांमध्ये काही गोण्या ओल्या कांद्याच्या तर काही गोण्या या कोरडा कांद्याच्या होत्या़ सध्या कांद्याचा भाव हजार ते १ हजार ५०० रुपयांपर्यंत आहे़ यात सुमारे ३० गोण्यांचे नुकसान झाल्याने अंदाजे १५ हजाराचे आर्थिक नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज आहे़