30 हजारांची दारू व मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2017 12:12 AM2017-04-12T00:12:20+5:302017-04-12T00:12:20+5:30
शहादा पोलिसांची कारवाई : मानमोडे गावाजवळ ‘गावठी’चे अड्डे उद्ध्वस्त
मंदाणे : शहादा तालुक्यातील मानमोडे येथील नदीकाठावर मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा टाकून गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत सुमारे 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैधरीत्या दारू तयार करणा:यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांची गाडी दिसताच दारू तयार करणा:यांनी पळ काढला. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहादा तालुक्यातील मानमोडे गावाचा स्वच्छता अभियानात व निर्मलग्राम योजनेत उत्कृष्ट पुरस्कार मिळालेले आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात नावलौकिक आहे. मात्र अलीकडच्या काळात या ठिकाणी जवळच असलेल्या नदीवर ठिकठिकाणी हातभट्टीची रसायनयुक्त दारूची निर्मिती करून ती विक्री करण्याचे जणू केंद्रच बनले आहे. अशा स्थितीत शहादा पोलिसांना मानमोडे गावाजवळ गावठी हातभट्टीच्या दारूची मोठय़ा प्रमाणात निर्मिती होऊन शेकडो लीटर दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच डीवाय.एस.पी. लतीफ तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी हवालदार दासू वसावे, धनराज जाधव, प्रकाश तमखाने, राहुल बोराडे, छोटूलाल पावरा, बलविंदर ईशी, अरुण चव्हाण, करण वळवी, अफसर शहा, देवीदास गागडे, सुनील वाकडे आदी सहका:यांसह मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मानमोडे गावाजवळील म्हैस नदीवरील अवैधरीत्या गावठी हातभट्टीचे दारू तयार करण्याच्या ठिकाणी अचानक छापा टाकला. त्या वेळी दारू तयार करणा:यांनी पोलिसांची गाडी दुरूनच पाहून पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी दारू तयार करण्याचे अड्डे तत्काळ उद्ध्वस्त केले. प्लॅस्टिकचे ड्रम, पत्र्याच्या टाक्या व मातीच्या माठांमधील महू, रसायनाचे मिश्रण नष्ट केले व रबरी टय़ूबमध्ये असलेली सुमारे 200 ते 250 लीटर तयार दारू, रिकामे केलेले 10 ड्रम, घागरी, माठ, पाच पत्र्याच्या टाक्या असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी शहादा पोलीस स्टेशनला करणसिंग वळवी, बलविंदर ईशी व अरुण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुनील चंद्रसिंग पावरा, राजेश वेल्ला पावरा, सरवी देवीसिंग पावरा, सर्व रा.मानमोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(वार्ताहर)
धाडसत्र सुरूच राहणार
मानमोडे येथील दारूचे अड्डे उद्ध्वस्त केल्याने मोठा दारूसाठा जप्त करण्याच्या पोलिसी कारवाईमुळे परिसरात ठिकठिकाणी अवैधरीत्या गावठी हातभट्टीची तसेच बनावट दारूची विक्री करणा:यांमध्ये खळबळ उडाली आहे. दारू तयार करून विक्री करणा:यांनी असे अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत, अन्यथा अशा प्रकारचे धाडसत्र सुरूच ठेवले जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिला आहे.
मानमोडे येथील दारू अड्डय़ावर धाडसत्र सुरू होताच दारू तयार करणा:यांनी लांबूनच गाडी बघून पळ काढला. मात्र त्यांची नावे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना पोलीस लवकरच ताब्यात घेणार असल्याचे समजते.