३ हजारांचा पोलिसांचा ताफा राहणार सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:32 PM2018-12-07T23:32:58+5:302018-12-07T23:34:03+5:30
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे : निवडणुकीसंदर्भात पोलिसांचे सुक्ष्म नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे- महापालिका निवडणूकीसाठी विविध पक्षांकडून आता प्रचार संपलेला आहे़ रविवारी होणारे मतदान आणि लागलीच दुसºया दिवशी होणारी मतमोजणी यासाठी पुरेशा प्रमाणात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ त्यासाठी सुक्ष्म असे नियोजन देखील करण्यात आले आहे़ यादरम्यान हुल्लडबाजी करणाºयांची गय केली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
महापालिका निवडणूकीसाठी रविवारी मतदान होणार आहे़ यावेळेस सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्ते तसेच मतदारांनी शांतता ठेवावी़ कायद्याचे पालन करावे़ गैरकृत्य करु नये, असे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितले़ मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद़़़़
प्रश्न : महापालिका निवडणुकीतील अंतिम टप्पा असल्याने आपल्या स्तरावर काय नियोजन केले आहे?
विश्वास पांढरे : निवडणुकीतील प्रचार आता थांबला आहे़ रविवारी मतदान असल्यामुळे आत्तापासूनच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मिळून एकत्रित सुमारे ३ हजारापर्यंत बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे़ बाहेर गावाहून देखील पुरेसा बंदोबस्त आपण मागविलेला आहे़ त्यांच्या नेमणुकीबाबतचे सुक्ष्म नियोजन केले जात आहे़
प्रश्न : महापालिका क्षेत्रात किती संवेदनशिल केंद्र आहेत?
विश्वास पांढरे : महापालिका क्षेत्रात असलेल्या मतदान केंद्राची पाहणी करण्यात आली आहे़ केंद्रालगत असलेल्या वसाहती आणि त्या भागात असलेल्या उमेदवारांनुसार १९ संवेदनशिल केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत़ त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येईल.
प्रश्न : बंदोबस्ताचे नियोजन कसे असेल?
विश्वास पांढरे : बंदोबस्त किती आणि कसा असेल हे निश्चित आहे़ केवळ आता कोणते अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती कुठे असेल याचे सुक्ष्म असे नियोजन सुरु आहे़ याशिवाय शहरातील स्थानिक पोलीस स्टेशन आणि तेथील अधिकारी हे आपापल्या भागात बंदोबस्त ठेवतील़ तर बाहेर गावाहून आलेल्या अधिकाºयांना भरारी पथक, फिक्स पॉर्इंट, नाकाबंदी याप्रमाणे प्राथमिक नियोजन आहे़
प्रश्न : मतदान केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत का?
विश्वास पांढरे : जे काही संवेदनशिल केंद्र निश्चित करण्यात आले आहेत त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेले आहे़ त्यानुसार सुचना देखील देण्यात आलेल्या आहेत़ प्रत्येक केंद्रावर अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, एसआरपी जवान तैनात असतील़
प्रश्न : निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधकात्मक कारवाई केली आहे का?
विश्वास पांढरे : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान शांततेत होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे़ त्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे़ ३२ जणांना तातडीने हद्दपार करत सुमारे ५०० जणांना शांतता ठेवण्यासाठी नोटीसा देखील दिलेल्या आहेत़
प्रश्न : मतमोजणीच्या बंदोबस्त कसा राहणार आहे?
विश्वास पांढरे : पोलिसांचा बंदोबस्त हा मतदान आणि मतमोजणीसाठी असणार आहे़ त्यातील काही मतदानाच्यावेळी तर काही मतमोजणीच्यावेळी नियंत्रण ठेवतील़ याशिवाय शहरातील काही भागात बैठे पथक असेल़ आवश्यक त्या ठिकाणी नाकाबंदी होईल़ याशिवाय राखीव बंदोबस्त देखील असणार आहे़