प्राथमिक शिक्षकांची ३३२ पदे रिक्त, धुळे जिल्हा परिषद शाळांतील स्थिती
By अतुल जोशी | Published: May 11, 2023 08:13 PM2023-05-11T20:13:05+5:302023-05-11T20:14:53+5:30
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो परिणाम
अतुल जोशी धुळे: शहरी भागात इंग्रजी शाळांचे प्रमाण वाढलेले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळांचा आधार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांनी कात टाकली असून, बहुतांश शाळा डिजिटल झालेल्या आहे. शाळांमध्ये विद्यार्थी संख्याही समाधानकारक आहे.मात्र अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मराठी माध्यमाच्या शिक्षकांची ३३२ तर केंद्र प्रमुखांची ३१ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे लवकर भरण्यात यावीत अशी मागणी होऊ लागली आहे.
धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या ११०४ असून, या शाळांमध्ये ८० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांनी कात टाकलेली आहे. बहुतांश शाळा डिजिटल झालेल्या आहेत. काही शाळा आदर्श आहेत. उच्चशिक्षित शिक्षक वर्गांमुळे या सरकारी शाळांची गुणवत्ता ही चांगली वाढलेली आहे. शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्या तरी दुर्गम, पाड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत.
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची ३६३२ पदे मंजूर असून, सध्या ३३०० शिक्षक कार्यरत असून ३३२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ३६ पदे असून, त्यापैकी २४ कार्यरत असून, ८ पदे रिक्त आहेत. केंद्र प्रमुखांची ३१ पदे रिक्त आहेत. याशिवाय उर्दू माध्यम शिक्षक, पदोन्नती मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक यांचीही पदे रिक्तच आहेत.