महिन्याभरातच 34 गावांना ‘टंचाई’!
By admin | Published: January 8, 2017 12:32 AM2017-01-08T00:32:02+5:302017-01-08T00:32:02+5:30
धुळे : जिल्ह्यातील 34 गावांना येत्या महिन्याभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल असा अंदाज जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आह़े
धुळे : जिल्ह्यातील 34 गावांना येत्या महिन्याभरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल असा अंदाज जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आह़े त्यानुसार आतापासूनच नियोजन करण्यास विभागाने सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितल़े गुरूवारी या संदर्भात विभागामार्फत आढावा घेण्यात येऊन टंचाई भासणा:या गावांची ओळख पटविल्याची माहिती या विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. पढय़ार यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झालेली आह़े ती निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने लक्ष केंद्रित करण्यात आले आह़े टंचाई निवारण्याकामी जिल्हा प्रशासनाचीदेखील मदत घेतली जात असून आवश्यक त्या योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावादेखील करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आह़े गावांच्या मागणीला सध्या प्राधान्यक्रम देण्यात आला आह़े
टँकरने पाणीपुरवठा
आवश्यक त्या पाणीपुरवठय़ाच्या योजना कुचकामी ठरल्यानंतर तातडीची योजना म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवरून घेण्यात येतो़ ही बाब सर्वाधिक खर्चिक असली तरी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणे महत्त्वाचे आह़े डिसेंबर महिन्यात जेमतेम पाणी मिळत होते. परंतु आता टॅँकर सुरू करणे गरजेचे ठरले आहे. सुरुवातीला धुळे तालुक्यातील कुंडाणे (वेल्हाणे), अजंग आणि साक्री तालुक्यातील बेहेड या गावांना टँकरने पाणीपुरवठा होत होता़ त्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील पथारे या गावांना टँकर सुरू करण्यात आला़ तर वारुड येथे गेल्या वर्षभरापासूनच टॅँकर सुरू आहे. धुळे तालुक्यात धामणगाव, जुन्नर, मोरदड, तांडा कुंडाणे, साक्री तालुक्यात पारगाव, सालटेक आणि शिंदखेडा तालुक्यातील रामी या गावांना टँकर सुरू झाले आहेत.
नव्या वर्षाला सुरूवात होताच विहिरींचे टप्प्याटप्प्याने अधिग्रहण करण्यास पाणीपुरवठा विभागाकडून सुरुवात झाली आहे. आरंभी 45 विहिरी अधिग्रहीत केल्या होत्या. पण, टंचाईची दाहकता वाढल्याने अधिग्रहीत विहिरींची संख्या वाढत आहे. या योजनेच्या माध्यमातून गावक:यांची तहान भागविली जात आह़े जिल्ह्यात तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आह़े जिल्ह्यात 18 ठिकाणी ही योजना मंजूर करण्यात आली आह़े धुळे तालुक्यात 11, साक्री तालुक्यात 5, शिंदखेडा तालुक्यात 2 याप्रमाणे 18 ठिकाणी तात्पुरत्या पाणी योजना मंजूर करण्यात आल्या़