बिजासन घाटातील अपघातात एकाच कुटूंबातील चौघाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 06:21 PM2020-05-17T18:21:28+5:302020-05-17T18:27:19+5:30
३ गंभीर जखमीत २ वर्षाचा एक चिमुकला
शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात सेंधव्याकडून येणारा तेलाचा टँकरचा बे्रक नादुरूस्त झाल्यामुळे तो दुभाजक तोडून विरूध्द दिशेला घसरून पडला़ त्याचवेळी शिरपूरकडून सेंधव्याला दुचाकी गाडीने जाणाऱ्या एकाच कुटुंबातील पती-पत्नींसह चिमुकले मुले दबल्याने ४ जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली़ तसेच ३ गंभीर जखमीत २ वर्षाचा एक चिमुकला आहे़
१७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महामार्गावरील बिजासन घाटाच्यावर ही दुर्दैवी घटना घडली़ सेंधवाकडून तेल भरून येणारा टँकटरचे अचानक ब्रेक नादुरूस्त झाल्यामुळे तशातच उतरती असल्यामुळे टँकर जोराने आल्याने चालक सरळ दुभाजकाला जावून आदळला़ टँकर एवढा जोरात होता की दुभाजक तोडून विरूध्द दिशेला जावून आदळला़ त्याचवेळी दोंदवाडीपाडा-पनाखेड ता़शिरपूर येथील सासरी आलेला कमल भिमसिंग पटेल (३८) राहणार साकड (सेंधवा) हा पत्नीसह ४ मुलांना घेवून दुचाकी गाडीने निघाला होता़ मार्गस्थ होत असतांनाच त्याच्या अंगावर काही न कळण्यापूर्वीच टँकर अंगावर आल्याने त्यात त्याच्यासह पत्नी नुरमाबाई (३५), मुलगी गौरी (२) गुडीया (१) असे चौघे जण दाबले गेल्याने जागीच मृत्यु झाला़ या दुर्दैवी घटनेत कमलची २ वर्षाची चिमुकली गुंजा (४) व ३ महिन्याची चिमुकली मुलगी रस्त्याच्या बाजूला फेकल्यामुळे ते दोघे बचावलेत़ त्यांना तातडीने सेंधवा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ मयत पावरा कुटुंब हे साकड-सेंधवा गावी जाण्यासाठी निघाले होते़ या घटनेत टँकर चालक व सहचालक देखील गंभीर जखमी झाले आहेत़ टँकर दुभाजकाला आदळल्यामुळे तो फुटल्यामुळे रस्त्यावर पूर्णत: तेल पडले होते़ रस्त्याचे दोन्ही बाजू पूर्णत: तेलाचे झाले होते़ घटनेची माहिती सेंधवा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने सेंधवा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले़ टँकर रस्त्याच्या मध्यभागी पडल्यामुळे एका बाजूची रहदारी ठप्प झाली होती़ तशातच रस्त्यावर पूर्णत: तेल असल्यामुळे एका बाजूने हळूवारपणे रहदारी करण्यात आली़ काहीवेळानंतर टँकर बाजूला करून रहदारी पूर्ववत करण्यात आली़ मयतांचे शवविच्छेदन झाल्यानंतर प्रांताधिकारी घनश्याम धनगर यांनी शव मयतांच्या गावी घेवून जाण्यासाठी व्यवस्था केली़ मयत कमल भिमसिंग पावरा याच्या वडिलांना साकड गावाचे सरपंच रविदास सोलंकी यांनी तातडीची मदत म्हणून ५ हजार रूपयांची आर्थिक मदत केली़