४० कि़मी पाठलाग; गुरे नेणारी कार पकडली
By admin | Published: February 25, 2017 11:55 PM2017-02-25T23:55:23+5:302017-02-25T23:55:23+5:30
सोनगीर पोलिसांची कामगिरी : चोरटे फरार, चार गुरे ताब्यात, गुन्हा दाखल
सोनगीर/धुळे : सोनगीर पोलिसांनी शनिवारी पहाटे तब्बल ४० कि़मी पाठलाग करून गुरांची वाहतूक करणारी कार तालुक्यातील रानमळा गावाजवळ पकडली़ मात्र चोरटे फरार झाले़ कारमध्ये एक गाय व तीन वासरांना निर्दयपणे कोंबण्यात आले होते़ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पांझरापोळ येथे दाखल केली आहेत़ याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सोनगीर पोलिसांच्या गस्ती पथकातील हेड कॉन्टेबल राजेंद्र पाटील व रवींद्र राजपूत २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता सरवड येथून नंदाणेकडे जात असताना त्यांना एका कार भरधाव वेगाने जाताना आढळली़ संशय आल्याने त्यांनी कारचा पाठलाग सुरू केला़ ती कार सरवड फाट्यापासून धुळे शहरात अवघ्या काही मिनिटात दाखल झाली़ पोलिसांनी तालुक्यातील रानमळा गावापर्यंत तब्बल ४० कि़मी.पर्यंत पाठलाग सुरू ठेवला़ पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्या गावाजवळ कार अडविण्यात पोलिसांना यश आले़ मात्र अंधाराचा फायदा घेत संशयित कार सोडून पसार झाल़े़ पोलिसांनी कार (क्ऱ एमएच २०- ४२०३) व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची एक गाय व ३ वासरे ताब्यात घेतली़
याप्रकरणी पो़हेक़ॉ. राजेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान पोलिसांनी ताब्यातील गुरे धुळ्यातील पांझरापोळ येथे दाखल केली आहे़