४२ प्राथ.शिक्षक झाले मुख्याध्यापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 09:41 PM2018-12-11T21:41:13+5:302018-12-11T21:41:47+5:30
जिल्हा परिषद : दोन वर्षांनी मिळाली शिक्षकांना पदोन्नती, अधिकाºयांनी केले शिक्षकांचे समुपदेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा परिषदेमधील खुल्या प्रवर्गातील ४२ शिक्षकांना आज मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पदोन्नतीबाबत समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर शिक्षण सभापती नूतन पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, उपशिक्षणाधिकारी पी.टी. शिंदे उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळांमधील खुल्या प्रवर्गातील मुख्याध्यापकांची पदोन्नती गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली होती. पदोन्नतीने मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत होती.
त्यानुसार मंगळवारी ही पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली. यावेळी शिक्षकांचे समुपदेशन करून, मोठ्या पडद्यावर शिक्षकांना रिक्त असलेली शाळा दाखविण्यात आल्या. प्राधान्यक्रमानुसार पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील ४२ प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती करण्यात आलेली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली होती.
मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळालेल्यांमध्ये शिरपूर १०, साक्री १७, शिरपूर ८ व धुळे तालुक्यातील ७ शिक्षकांचा समावेश आहे.
दरम्यान ४२ शिक्षकांना पदोन्नती मिळाल्याने ती पदे रिक्त झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १७ विषय शिक्षकांना व १७ पदवीधर शिक्षकांना पुन्हा प्राथमिक शिक्षकाच्या पदावर काम करावे लागणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. दरम्यान पदोन्नती मिळालेल्या सर्वच शिक्षकांना नवीन मिळालेल्या शाळांवर हजर होण्याचे आदेश शिक्षण विभागातर्फे देण्यात आलेले आहेत.
पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहायक प्रशासन अधिकारी एल.पी. भदाणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रंजना साळुंखे, रवींद्र देवरे, वरिष्ठ सहायक प्रविण शिंदे, मंगेश राजपूत, तुषार बैसाणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील ७७ शिक्षकांचे समायोजन
धुळे - जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमधील ७७ शिक्षकांचे समायोजन नुकतेच करण्यात आले आहे.मुख्याध्यापक व संस्थांनी संच मान्यतेसाठी कागदपत्रे सादर केल्यानंतर दस्तऐवजाची पडताळणी झाली. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची यादी निश्चित करण्यात आली. संचमान्यतेनुसार जिल्ह्यात १२ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. गेल्यावर्षी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने ९९ शिक्षकांना अतिरिक्त ठरविले होते. त्यापैकी ८४ शिक्षकांचे आॅनलाइन समायोजन करण्यात आले होते. मात्र यातील काही शिक्षकांना समायोजित करण्यात आले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यात ७७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. या शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी नुकतेच चावरा इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये समूपदेशन शिबिर झाले. त्यात शिक्षकांना शाळांची यादी दाखवून त्यांचे समायोजन केले. यावेळी माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक उपस्थित होते. समायोजनानंतरही संस्था चालकांनी या शिक्षकांना हजर करून न घेतल्यास ही पद व्यपगत होऊ शकतात. दरम्यान समायोजित झालेल्या शिक्षकांना बुधवारी रूजू होण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.