आमोदे शिवारातून ४३ लाखांचे स्पिरीट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 04:14 PM2019-01-03T16:14:45+5:302019-01-03T16:15:59+5:30
३० हजार लिटर : पिकअप वाहनासह टँकर हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील आमोदे शिवारात उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांच्या पथकाने छापा टाकून एक पिकअप वाहनासह टँकर पकडला़ त्यातून ३० हजार स्पिरीट जप्त करण्यात आला़ त्याची किंमत ४३ लाख ५४ हजार २०० इतकी होते़ ही कारवाई बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास झाली़
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील आमोदे शिवारात टँकरमधून स्पिरीट पाईपाद्वारे ड्रममध्ये गैरकायदेशिररित्या भरले जात असल्याबाबत गोपनीय माहिती शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांना माहिती मिळाली होती़ त्यानंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप गावित यांच्या नेतृत्वाखाली थाळनेरचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, हेड कॉन्स्टेबल लादुराम चौधरी, पोलीस कर्मचारी रविंद्र पवार, बापुजी पाटील, प्रविण गोसावी, आऱ एस़ रोकडे, दीपक पाटील, राहुल सैंदाणे, मंगेश मंगळे, शिरसाठ यांनी कारवाई केली़ या पथकाने शिरपूर फाट्यावरील एका लॉजच्या मागील बाजूस असलेल्या ठिकाणी छापा टाकला़
यावेळी पीबी ११ सीएम २३०२ या क्रमांकाच्या टँकरमधून एमएच १५ एफव्ही २३९१ या महिंद्र पिकअप गाडीतील ड्रममध्ये पाईपाच्या सहाय्याने स्पिरीट रसायन भरले जात असल्याचे आढळून आले़ पोलिसांना पाहताच तेथील वाहनचालकांसह इतरांनी शेतात पलायन केले़ त्यांच्या मागे धावून पोलिसांनी त्यातील एकाला पकडले़
पोलिसांनी ताब्यात घेतलेला इसम हा ट्रकचा क्लीनर असून राजनाथ राजदेव यादव (३१, रा़ धनछुआ, मध्यप्रदेश) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले़ पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता टँकर चालक सुभाष शिवराम यादव (रा़ महाराजगंज, उत्तरप्रदेश) स्पिरीट घेणारे शिरपूर येथील योगेश राजपूत, विजय बागले यांच्यासह अन्य चार जण असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ पोलिसांनी या ठिकाणाहून दोन्ही वाहनांसह तब्बल ३० हजार लिटर स्पिरीट व अन्य साहित्य जप्त केले आहे़ त्याची किंमत ४३ लाख ५४ हजार २०० इतकी असून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ पुढील तपास सुरु आहे़