धुळे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची ४३ पदे व्यपगत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 05:19 PM2018-03-26T17:19:24+5:302018-03-26T17:19:24+5:30
८५ पैकी फक्त १७ शिक्षकांचे झाले समायोजन
आॅनलाइन लोकमत
धुळे : संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना समायोजनांतर्गत रूजू करून न घेतलेल्या शाळेतील पदे व्यपगत करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील ४३ शिक्षकांचे पदे व्यपगत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ८५ शिक्षक अतिरिक्त ठरलेले होते. त्यांचे ५५ शाळांमध्ये आॅनलाईन समायोजनाची प्रक्रिया झालेली होती. अतिरिक्त शिक्षकांना समावून घ्यावे यासाठी शिक्षणाधिकाºयांनी डिसेंबर २०१७ मध्ये संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना लेखी आदेश दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी फक्त १७ शिक्षकांना आपल्या शाळेत समावून घेतलेले आहे. उर्वरित शिक्षकांना शाळांमध्ये समावून घेण्यात आलेले नाही.
या संदर्भात शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दोनवेळा मुख्याध्यापक व संस्था चालकांची बैठक घेऊन, अतिरिक्त शिक्षकांना समावून घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. अतिरिक्त शिक्षकांना समावून न घेतल्यास मुख्याध्यापकांचे वेतन स्थगित केले जाईल असा इशारा दिला होता. दरम्यान मुदत उलटूनही मुख्याध्यापकांनी अतिरिक्त शिक्षकांना हजर करून घेतले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ४९ मुख्याध्यापकांचे डिसेंबर २०१७ चे वेतन स्थगित करण्यात आले होते. तरीही अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटलाच नाही.
दरम्यान पाठपुरावा करूनही शाळा संबंधित शिक्षकांना रुजू करून घेत नसतील तर अशा शाळांमधील पदे संच मान्यता २०१७-१८ करतांना व्यपगत करण्यात कार्यवाही करावयाची असल्याचे शिक्षण संचालक गंगाथर म्हमाणे यांनी राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
जिल्ह्यातील ८५ पैकी फक्त १७ शिक्षकांना शाळांनी हजर करून घेतले आहे. उर्वरित ६८ शिक्षकांना शाळांनी समावून घेतले नाही. या ६८ पैकी २५ शिक्षक न्यायालयात गेल्याने, ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे आता उर्वरित ४३ माध्यमिक शिक्षकांची पदे या निर्णयानुसार व्यपगत होणार असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांनी दिली.