सायबर सेलमार्फत ४५ गुन्ह्याची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 07:23 PM2018-03-29T19:23:50+5:302018-03-29T19:23:50+5:30
पोलीस प्रशासन : खून, दरोडा, जबरी चोरीच्या तपासासाठी उपयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पोलीस प्रशासनाच्या तपास कामासाठी सायबर सेल हा विभाग अत्यंत उपयुक्त असून गेल्या तीन महिन्यात ४५ पेक्षा अधिक गुन्ह्याची उकल या विभागाच्या मदतीने करण्यात आली आहे़ त्यात खूनासह दरोडा, जबरी चोरीसह मोबाईल चोरी आणि आॅनलाईन फसवणुकीच्या घटनांचा समावेश आहे़ आरोपींना जेरबंदही करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली़
इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे़ दैनंदिन जीवनातले बरेच व्यवहार याच इंटरनेटच्या माध्यमातून पार पाडले जातात़ पण, अपुºया माहितीच्या आधारावर त्यांचा वापर धोकादायक देखील ठरला आहे़ सायबर गुन्हेगार याच उणीवांचा फायदा उठवून इतरांचे सामाजिक आणि आर्थिक नुकसान करतात़
परिणामी इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करणे ही काळाची गरज ठरत आहे़ सायबर गुन्ह्यांमध्ये हॅकिंग, नोकरीचे आमिष दाखवून होणारी फसवणूक, विवाह विषयक फसवणूक, वैयक्तिक ओळखीतून चोरी, बँक विषयक फसवणूक, एटीएमसंबंधी फसवणूक, समाज माध्यमांद्वारे होणारे गुन्हे आणि आॅनलाईन खरेदी करताना होणारी फसवणूक यासारख्या काही बाबी आहेत की त्याचा सायबर गुन्हेगारीमध्ये संबंध येतो़
याशिवाय खून, दरोडा, जबरी चोरी यासारख्या विविध प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर पोलिसांच्या तपास कामात सायबर सेल या विभागाची महत्वपूर्ण भूमिका असते़