धुळे जिल्हयात ४६ साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:05 PM2018-06-13T16:05:25+5:302018-06-13T16:05:25+5:30

जिल्हा परिषद : साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

46 Disease control room in Dhule district | धुळे जिल्हयात ४६ साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

धुळे जिल्हयात ४६ साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

Next
ठळक मुद्देमंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हयातील १०३ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे जि.प. सदस्यांनी दूषित पाण्याचा प्रश्न उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली होती. सद्य:स्थितीत ज्या गावांना दूषित पाणीपुरवठा होतो आहे; त्या गावांना शुध्द पाणी देण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनासमोर राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे :    पावसाळयाच्या तोंडावर साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्हयात ४६ साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आले आहे. साथीच्या आजारांचा फैलाव होउ नये; यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून ग्रामीण भागात जनजागृतीही केली जात आहे. 
जिल्हयाची ग्रामीण लोकसंख्या १४, ७७, ६२६ व शहरी भागाची लोकसंख्या ५, ६२, ०३६ अशी एकूण २० लाख ३९ हजार ६६२ इतकी लोकसंख्या आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३२ उपकेंद्र व १३ आयुर्वेदीक दवाखाने आहेत. पावसाळयात साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हयातील ४१ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी साथ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तसेच साक्री, शिरपूर व धुळे पंचयात समिती परिसर व शिंदखेडा शहरातील ग्रामीण रुग्णालयात हा कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीया इमारतीतही हा विभाग कार्यान्वीत करण्यात आला आहे. 
२४ तास सुरू राहणार कक्ष; 
८२ पथकांची नियुक्ती
२ आॅक्टोबर २०१८ पर्यंत साथरोग नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. यासाठी आरोग्य विभागामार्फत ८२ पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पथकात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य साहाय्यक,  आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परिचर व वाहनचालक आदींचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लागणारा औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी परिपूर्ण ठेवण्यात आला आहे. 

विरखेलला दिली पथकाने भेट 
साक्री तालुक्यातील विरखेल येथे संसर्गजन्य आजाराचे २५ रूग्ण आढूळन आल्यानंतर बुधवारी आरोग्य विभागाच्या पथकाने गावात भेट दिली. त्यावेळी संबंधित रुग्णांची तपासणी केली असता, त्यांना सांधदुखी किंवा व्हायरल               फि व्हर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून संबंधित रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.  या वेळी डॉ. एस.व्ही.सांगळे, डॉ. आर.व्ही. पाटील, डॉ. संजय मोरे, जि.प. सदस्य विलास बिरारीस आदी उपस्थित होते. 
संशयित १३ रुग्णांचे नमुने गेले तपासणीला 
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे  ८ व ९ जूनला जिल्हयातील १३ रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले आहे. पैकी ६ नमुने हे डेंग्यू, व चिकनगुनिया तर उर्वरित ७ संशयित रुग्णांचे रक्तनमुने  हे मलेरिया आजारासाठी घेतल्याची माहिती जिल्हा साथरोग शास्त्रज्ञ राजेश भोसले यांनी दिली. हे रक्तनमुनेही तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आल्याचे ते म्हणाले. 

Web Title: 46 Disease control room in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.