शिरपूर तालुक्यात ७० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:08 PM2019-10-22T12:08:22+5:302019-10-22T12:09:02+5:30
विधानसभा निवडणूक : लढतीतील चुरशीमुळे निकालाकडे लक्ष, २४ रोजी मतमोजणी
शिरपूर : शिरपूर विधानसभा निवडणूकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले़ सरासरी ७० टक्के मतदान होवून निवडणूक रिंगणातील ७ उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक यंत्रामध्ये ईव्हीएम सीलबंद झाले़ मतमोजणी २४ ला सकाळी सुरू होणार आहे़
शिरपूर विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरूवात झाली़ सकाळीच बहुतांश मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या, परंतु मॉकपोल उशिरा घेतल्यामुळे काही मतदान केंद्रावर १०-१५ मिनीटे मतदान करण्यास उशिरा झाले़ तसेच शहरातील ब्रम्हटेक भागातील मतदान केंद्र २२३ वर व्हीव्हीपॅट नादुरूस्त झाल्यामुळे तब्बल ४० मिनीटे मतदान करण्यास उशिर झाला़ अखेर ते बदल्यानंतर मतदान सुरू झाले़
शिरपूर विधानसभेसाठी ३१९ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले़ पुरूष मतदार १ लाख ६३ हजार ५३८ तर महिला मतदार १ लाख ५७ हजार २१ असे एकूण ३ लाख २० हजार ५५९ मतदार होते़ सकाळी ९ वाजेपर्यंत ९ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत २३़३४, दुपारी १ वाजेपर्यंत ३८़१७, दुपारी ३ वाजेपर्यंत ५२़६७ तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६२़४७ टक्के इतके मतदान झाले़ त्यानंतर मात्र केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या़ सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर गर्दी होती़ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान होईल असा प्राथमिक अंदाज आहे़
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर काही भागातील मतदान केंद्रावर भल्या मोठ्या रांगा दिसून आल्यात़ त्यानंतर दुपारच्या वेळेस थोडा वेग मंदावला़ काही ठिकाणी तर पूर्णपणे शुकशुकाट होता़ शहरातील मुस्लीम बहुल वस्तीतील मतदान केंद्रावर मोठ-मोठ्या रांगा दिसून आल्यात़ पुरूषांपेक्षा अनेक ठिकाणी महिला मतदारांची गर्दी दिसून आली़ मतदान करतांना शासकीय अधिकृत ओळखपत्र ग्राह्य धरले जात होते़
तरुणांमध्ये ‘सेल्फी’ची क्रेझ
अपंगासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली होती़ शिरपूर शहरात उमेदवारांकडून मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांचा वापर करण्यात आला़ उत्साही तरूणांनी मतदानानंतर स्वत:चे सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर टाकले जात होते़ मतदारसंघात ७ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही महायुतीचे काशिराम पावरा व अपक्ष उमेदवार डॉ़जितेंद्र ठाकूर यांच्यात आहे़