५३ नवीन बंधाऱ्यांची होणार निर्मिती

By admin | Published: December 26, 2016 10:55 PM2016-12-26T22:55:34+5:302016-12-26T22:55:34+5:30

शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

53 new camps will be created | ५३ नवीन बंधाऱ्यांची होणार निर्मिती

५३ नवीन बंधाऱ्यांची होणार निर्मिती

Next

ऑनलाइन लोकमत
दोंडाईचा, दि. 26 -  शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार बुराई नदीत आता नव्याने ५३ ठिकाणी साठवण बंधारे तयार होणार असून त्यासाठी २० कोटी ६१ लाखांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी ४ महिने पाण्यात तर ८ महिने तहानलेली असते. त्यात पावसाअभावी तालुक्यातील पाण्याची टंचाई विचारात घेता, बुराई नदी काठावरील गावातील पाणी टंचाई आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने बुराई नदी बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
बंधारे नसल्यामुळे पाणी वाहून जाते
शिंदखेडा मतदारसंघाच्या दृष्टीने बुराई नदी ही साक्री तालुक्यातील दुसाणे, बळसाणे परिसरासह शिंदखेडा तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या शेवाडे, चिमठाणे, शिंदखेडा, वरसुस येथून वाहत जाऊन थेट तापीला मिळते.
नदीला दरवर्षी पावसाळ्यात पाणी असते. परंतु, पाणी अडविण्यासाठी बंधारे नसल्याने हे पाणी तापीनदीच्या प्रवाहाद्वारे वाहून जाते. त्यादृष्टीने मंत्री रावल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बुराई नदीला बारमाही करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता.
फेरप्रस्ताव सादर
आघाडी शासनाच्या काळात मानव विकास मिशनमधून या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु, आघाडी शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. म्हणून राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्री रावल यांनी ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाला याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव पुन्हा सादर केला होता. याप्रश्नी अनेकदा बैठका झाल्या. अखेर ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाने बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
बुराई नदी बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असली तरी बुराई नदीच्या काठावरील दुसाणे, बळसाणे, म्हसाळे, उभंड, सतमाने, जखाणे, अमराळे, दरखेडा, चिमठाणे, शेवाळे, रेवाडी, कढरे, सुलवाडे, फोफरे, घाणेगांव, नागपूर, अशा विविध ठिकाणी ५३ साठवण बंधाऱ्यांची नव्याने निर्मिती होणार असून हजारो हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे.
पाणी साठवणुकीवर भर
मंत्री रावल यांनी हा प्रस्ताव तयार करताना शिंदखेडा मतदारसंघातील बुराई नदीतील बंधाऱ्यांमध्ये पूर्णत: पाणी साठवणूक होईल, असा प्रस्ताव तयार केला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शिंदखेडा तालुक्याचा दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
मागील काळातील साठवण बंधाऱ्याचा कामाचा अनुभव पाहता मंत्री रावल यांनी बंधाऱ्यांची कामे दर्जेदार स्वरूपाची व्हावीत; तसेच त्यांचा पुढच्या ५० वर्ष जनतेला लाभ व्हावा म्हणून ही सर्व कामे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामाना प्रशासकीय मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे कामांची गुणवत्ता राखण्यास मोठी मदत होणार आहे.

Web Title: 53 new camps will be created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.