धुळे विभागाला १० दिवसात ५८ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 11:36 AM2020-09-03T11:36:22+5:302020-09-03T11:36:46+5:30
एस.टी.ने ५५ हजार प्रवाशांनी केला प्रवास, मालवाहतुकीतून मिळाले २२ लाख रूपये
आॅनलाइन लोकमत
धुळे :कोरोनामुळे तब्बल साडेचार महिने बंद असलेली आंतरजिल्हा बसवाहतूक २० आॅगस्टपासून सुरू करण्यात आलेली आहे. गेल्या १० दिवसात धुळे विभागाला ५८ लाख ३८ हजार ६९८ रूपयांचे उत्पन्न मिळालेले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, २२ मार्चपासून एस.टी.ची. सेवा बंद होती. त्यानंतर लॉकडाउनच्या चौथ्या टप्यात शासन निर्देशानुसार रेड झोन व नॉन रेडझोन असे दोन टप्पे करण्यात आले होते. त्यानुसार नॉनरेड झोनमध्ये २२ मे २०२० पासून बससेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला होता. ंमात्र या बससेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.
दरम्यान २० आॅगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झालेली आहे. गेल्या १० दिवसात परिवहन महामंडळाच्या आंतरजिल्हा बससेवेला प्रतिसाद मिळाला आहे.
धुळे विभागाने १० दिवसात ३ लाख ५५ हजार ४९० किलोमीटर बस चालवून त्याद्वारे ५५ हजार प्रवाशांची वाहतूक केली. यातून विभागाला ५८ लाख ३८ हजार ६९८ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
तर मालवाहतुकीतून गेल्या तीन महिन्यात २२ लाख १२ हजार ६८४ रूपयांचां महसूल प्राप्त झाल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. जिल्हांतर्गत वाहतूक करतांना बसमध्ये फक्त २२ प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली आहे. बसमध्ये सामाजिक अंतर व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक आहे. धुळे विभागातून संगमनेर-पुणे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे औरंगाबाद, चोपडा या लांब व मध्यम पल्याच्या बसेस सुरू आहेत. तालुकांतर्गत शिंदखेडा, शिरपूर साक्री, दोंडाईचा, आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेस सुरू आहे.