६ सदस्यांची चौकशी समिती गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 10:40 PM2020-08-21T22:40:28+5:302020-08-21T22:40:49+5:30

जि.प. स्थायी समिती : अपंग युनिटचा मुद्दाही गाजला, दयनीय शाळांच्या स्थितीवरही झाली चर्चा

6-member inquiry committee formed | ६ सदस्यांची चौकशी समिती गठीत

६ सदस्यांची चौकशी समिती गठीत

Next

धुळे :आदिवासी शेषफंड व तीर्थक्षेत्र विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जि.प. सदस्या सुनीता सोनवणे यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. त्या अनुषंगाने या कामांची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यांची चौकशी समिती गठित केल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.दरम्यान अपंग युनिटमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्यांनी केल्याने आजची स्थायीची सभाही भ्रष्टाचाराच्या मुद्यावरूनच गाजली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. व्यासपीठावर उपाध्यक्षा कुसुमबाई निकम, समाज कल्याण सभापती मोगरा पाडवी, शिक्षण सभापती मंगला पाटील, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे होते.
५ आॅगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्या सुनीता सोनवणे यांनी आदिवासी शेषफंडात १ कोटीचा व तीर्थक्षेत्र विकास कामांमध्येही मोठा भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सीईओना निवेदन देवून जिल्हा परिषदेने काय कार्यवाही केली याची विचारणाही केली होती. या गैरकारभाराच्या चौकशीसाठी सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाने व लेखाधिकारी पी.यु.देवरे यांच्या नियंत्रणाखाली सहा सदस्यांची चौकशी समिती गठीत केली. या समितीत एस.ओ. पढ्यार, एस.एच.भामरे, एच.ए.भिरूटकर, बी.एच.पाटील, संजय येवले, पी.बी.महाजन यांचा समावेश आहे. ही समिती आठ दिवसात आपला अहवाल सीईओंना सादर करणार आहे. दरम्यान या चौकशी समितीत प्रत्येक तालुक्यातील एक सदस्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सदस्य प्रा. संजय पाटील यांनी केली.
आजच्या सभेत अपंग युनिटचा मुद्दाही चांगलाच गाजला. अपंग युनिटमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार सदस्य वीरेंद्रसिंंग गिरासे यांनी केली. ज्यांची या युनिटमध्ये नियुक्ती झालेली आहे, त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. काहींचे समायोजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सभागृहाला माहिती दिल्याशिवाय कोणाचेही समायोजन केले जाणार नाही असा शब्द अध्यक्ष डॉ. रंधे यांनी दिला.
ग्रामपंचायत कार्यालय दुसरीकडेच बांधले
साक्री तालुक्यातील बुरखेड-पिंजारझाडी या ग्रुप ग्रामपंचायतीचे कार्यालय बांधण्यासाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाला. हे कार्यालय बुरखेड याठिकाणी बांधणे आवश्यक असतांना ते पिंजारझाडी येथे बांधण्यात आले.गेल्या पाच वर्षांपासून हा विषय चर्चिला जात असतांनाही त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याचे लक्षात आणून दिले.
जलसंधारणच्या सभेवर भामरे यांचा बहिष्कार
स्थायी सभेपूर्वी जलसंधारणची सभा झाली.मात्र लघुसिंचनची किती व कोणती कामे सुरू आहेत याची माहिती दिली जात नाही. अजेंड्यावर लघुसिंचनच्या कामाचा संदर्भ घेतला जात नाही. त्यामुळे लघुसिंंचनच्या सभेवर सत्ताधारी गटाचे सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी बहिष्कार टाकला होता.गेल्या आठ महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या एकाही बैठकीचे टिपण्णी मिळत नाही. इतिवृत्त मिळत नाही. सदस्यांना इतिवृत्त न देणारीही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असल्याची टीका त्यांनी केली. आतापर्यंत चारवेळा जिल्हा परिषदेचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र आजपर्यंत असे कामकाज झालेले नाही,असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलेले आहे.
सभा कशी चालवायची ते शिकवू नका : रंधे
गेल्या काही दिवसात काही सदस्य माध्यमांना अपूर्ण माहिती देत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची नाचक्की होत असल्याचे अध्यक्ष डॉ. रंधे यांनी सांगितले. त्यावर पोपटराव सोनवणे यांनी माध्यमच माहिती मागत असल्याने, ती दिली असे सांगितले. त्यावरून रंधे-सोनवणे यांच्यात शाब्दीक वाद झाला. सभा कशी चालवायची हे मला शिकवू नका, तसेच सभेचे प्रोटोकॉलही शिकवू नका असे रंधे यांनी सांगितले.
आम्हाला बोलू दिले जात नाही : सोनवणे
अपंग युनिटच्या मुद्यावर चर्चा सुरू असतांना विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी काही मुद्दे मांडले. त्यावर सदस्य अरविंद जाधव यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असता, सोनवणे संतप्त झाले. आम्ही अध्यक्षांकडे मागणी करत असतांना प्रत्येकवेळी काहीजण मध्येच लुडबुड करीत असतात. आम्हाला बोलू दिले जात नसल्याचा आरोपही सोनवणे यांनी यावेळी केला.

Web Title: 6-member inquiry committee formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे