५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:04 PM2019-01-04T23:04:06+5:302019-01-04T23:04:25+5:30

पाणीटंचाई : शिंदखेडा तालुक्यातील ४० गावांसाठी ४७ विहिरींचे केले अधिग्रहण, साक्री तालुक्यात समाधानकारक स्थिती

60 wells for 52 villages have been acquired | ५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहित

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही, त्याचबरोबर परतीच्या पावसानेही दडी मारली. परिणामी अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झालेले आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनातर्फे ५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान पाणी टंचाईची सर्वाधिक झळ शिंदखेडा तालुक्याला बसत आहे. या तालुक्यातील ९ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई शाखेने दिलेली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. गेल्यावर्षी सुरवातीचा कालावधी वगळता मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यातल्या त्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविली. याचा परिणाम खरीपाच्या पिकांबरोबरच पाणी टंचाईवरही होवू लागला. कमी पावसाचा फटका धुळे, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील गावांना बसू लागला आहे. दरवर्षी साधारणत: जानेवारी महिन्यानंतर पाणी टंचाई निवारणार्थ विहिरी अधिग्रहित केल्या जातात. मात्र पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता डिसेंबर १८ पासूनच विहिरी अधिग्रहित करण्यास सुरूवात झालेली आहे.
५२ गावांसाठी
६० विहिरी अधिग्रहित
जिल्ह्यात ५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यात ५० विहिरी या पिण्याच्या पाण्यासाठी तर १० विहिरी या टॅँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.
सर्वाधिक गावे
शिंदखेडा तालुक्यातील
विहिरी अधिग्रहित केलेल्या गावांमध्ये शिंदखेडा तालुक्यातील गावांची संख्या सर्वात जास्त आहे. या तालुक्यातील ४० गावांसाठी ३९ विहिरी तर टॅँकर भरण्यासाठी ८ अशा एकूण ४७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.
तर धुळे तालुक्यातील ७ गावांसाठी ८ विहिरी अधिग्रहित केल्या असून, त्यातून ६ विहिरी या पिण्याच्या पाण्यासाठी व दोन विहिरी या टॅँकर भरण्यासाठी आहे. शिरपूर तालुक्यातील ५ गावांसाठी पाच विहिरी अधिग्रहित केलेल्या असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आलेले आहे.
साक्री तालुक्यात विहिर अधिग्रहित नाही जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने, त्या तालुक्यांमध्ये प्रशासनाला आतापासून विहिरी अधिग्रहित कराव्या लागलेल्या आहेत. त्यामानाने साक्री तालुक्याची स्थिती समाधानकारक आहे. या तालुक्यात डिसेंबर १८ अखेरपर्यंत एकाही गावासाठी विहिर अधिग्रहित केलेली नाही, किंवा एकाही गावात टॅँकरने पाणी पुरवठा सुरू नाही.
पाणीसाठा कमी जिल्ह्यात १२ मध्यम प्रकल्प असून, त्यात पाणीसाठा खूपच कमी आहे. या मध्यम प्रकल्पात १५१.६६ दशलक्ष घनफूट पाणी असून, त्याची टक्केवारी ४०.६७ टक्के आहे. मध्यम प्रकल्पातील पाण्याची ही स्थिती ४ जानेवारी १९ रोजीची आहे. वाडीशेवाडी, अमरावती, सोनवद, कनोली या मध्यम प्रकल्पात पाण्याचासाठा शुन्य आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पाच्या जवळ असलेल्या गावांना पाणी टंचाई भेडसावण्याची भीती आहे.

Web Title: 60 wells for 52 villages have been acquired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे