एसटी महामंडळातील ६४२ चालक आरटीओकडे प्रती नियुक्तीवर वर्ग होणार
By सचिन देव | Published: March 22, 2024 07:55 PM2024-03-22T19:55:10+5:302024-03-22T19:55:10+5:30
अपघातांवर नियंत्रण येणार : वायुवेग वाहनासाठी आरटीओकडे चालकांची कमतरता
धुळे: राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओतर्फे सुरक्षित वाहतुकीसाठी व अपघातांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नवीन इंटरसेप्ट वाहने सुरू करण्यात येत आहेत. मात्र, सध्या स्थितीला राज्यभरात आरटीओकडे चालकांची कमतरता असल्यामुळे, ही वाहने चालविण्यासाठी एसटी महामंडळाच्या चालकांचीमदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळातर्फेही आरटीओला विभागाकडे राज्यभरातील ६४२ चालक प्रतिनियुक्तीवर वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यात गेल्या काही महिन्यात राज्यातील विविध महामार्गांवर अपघाताच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या असून, यात अनेक चालक मद्य प्राशन करून बेजाबदार वाहने चालवित असल्याचे प्रकार आरटीओच्या निदर्शनास आले आहेत. तसेच मोबाईलवर बोलणे, वाहतुकीच्या मर्यांदाचे उल्लंघन करणे, मुदतबाह्य वाहने रस्त्यावर चालविणे, वाहन परवाना नसणे आदी कारणांमुळे देखील रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागातर्फे या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओ विभागाला इंटरसेप्ट वायुवेग वाहने पुरविण्यात येणार आहे.
या वाहने चालविण्यासाठी आरटीओकडे पुरेसे चालक नसल्यामुळे, एसटी महामंडळातील अतिरिक्त चालक आरटीओकडे वर्ग करण्यात येणार आहे. आरटीकडे एकूण ६४२ चालक वर्ग करण्यात येणार असून, सुरूवातीला ४५१ चालकांची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना पत्र पाठवून, अतिरिक्त कनिष्ठतम चालकांची यादी मागविली आहे.
तर चालकांचा पगार एसटी महामंडळच करणार..
एसटी महामंडळातर्फे आरटीओ विभागाकडे चालक वर्ग करण्यात आल्यानंतर, या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र एसटी महामंडळातर्फेच केला जाणार आहे. हे चालकांची
मुळ नियुक्ती एसटी महामंडळात असल्याने आरटीओत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्यानंतरही, या चालकांना एसटी महामंडळाच्या नियमानुसार वेतन, भत्ते व इतर सुविधा लागू राहणार असल्याचे विभाग नियंत्रकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आरटीओ मध्ये अतिरिक्त चालक पाठविण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार धुळे विभागातर्फे अतिरिक्त चालक
पाठविण्याबाबत पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.- सौरभ देवरे, विभागीय वाहतुक अधिकारी, एसटी महामंडळ, धुळे विभाग.