६७ लाखांचा निधी परत जाणार !
By admin | Published: March 18, 2017 12:29 AM2017-03-18T00:29:30+5:302017-03-18T00:29:30+5:30
जि.प. स्थायी समिती सभा : पदाधिकाºयांनी घेतली आरोग्य विभागाची झाडाझडती
धुळे : जिल्ह्यात चार आरोग्य केंद्रांसह १५ उपकेंद्रांचे काम मंजुरी व निधी उपलब्ध असतानाही रखडले आहे. तर तांत्रिक मान्यता रद्द झाल्याने आरोग्य विभागाचा ६७ लाखांचा निधी परत जाणार असल्याने शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आरोग्य विभागाची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. संतप्त पदाधिकाºयांकडून या विभागाच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरेही ओढण्यात आले.
निधी परत जाणार!
जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी २ वाजता जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या अध्यक्षतेत ही सभा पार पडली. आरोग्य विभागाचा ६७ लाख रुपयांचा निधी खर्च होणार नसल्याने परत जाणार आहे. पटलावर हा विषय येताच सदस्य व पदाधिकारी संतप्त झाले. जिल्हा नियोजन, विकास समिती (डीपीडीसी)कडून नावीन्यपूर्ण योजनांसाठी हा निधी देण्यात आला होता. परंतु या निधीची तांत्रिक मान्यताच रद्द झाल्याने हा निधी परत जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. मात्र या विभागाच्याच हलगर्जीपणामुळे हा निधी परत जाणार असल्याचा आरोपच पदाधिकाºयांकडून झाला. डीपीडीसीकडून पदाधिकारी महत्प्रयासाने निधी मिळवितात. परंतु तो वेळेत खर्च करण्यास अधिकारी अक्षम ठरत असल्याचे सांगून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ओमप्रकाश देशमुख यांना, अधिकारी व कर्मचाºयांची बैठक घेऊन याबाबत मार्गदर्शन करा, अशी सूचना पदाधिकाºयांनी केली.
या संदर्भात अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेऊन सूचना देऊ तसेच निधी परत जाणार असल्याबाबत जे कर्मचारी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सीईओ देशमुख यांनी दिले.
आरोग्य केंद्रांसाठी पाठपुरावा करा
जिल्ह्यात नव्याने ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १५ आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांचे काम रखडल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. या केंद्रांच्या बांधकामांना मंजुरीसह निधीही उपलब्ध झालेला आहे. मात्र केवळ जागांचा प्रश्न सुटत नसल्याने ती रखडले आहेत. यावर संबंधित तहसीलदारांकडे पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे पडले. त्यावर पदाधिकाºयांनी यावर त्वरित कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
प्रत्येक तालुक्यास एक केंद्र
नव्याने होणाºया चारपैकी दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे शिरपूर व साक्री या आदिवासीबहुल तालुक्यांना तर उर्वरित दोन धुळे व शिंदखेडा तालुक्यांना देण्याची सूचना पदाधिकाºयांनी केली. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात एक प्राथमिक आरोग्य केंद्राची भर पडणार आहे.
अर्थविभागात बिलांना विलंब
जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात फाईलींसह बिलांनाही विलंब होत असल्याच्या तक्रारी सभेत करण्यात आल्या. त्यावर एक बिल मंजुरीसाठी ७ टेबलांवर फिरते. यात एखादा कर्मचारी रजेवर गेल्यास ते बिल अडकते व त्यास मोठ्या प्रमाणात विलंब होतो, असे स्पष्ट करण्यात आले. यावर पदाधिकाºयांनी फाईल व बिलांच्या मंजुरीसाठी असलेल्या टेबलांची संख्या कमी करण्यास सांगून ही समस्या दूर करण्याची सूचना केली.
सर्व विषय मंजूर
या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. त्यात आरोग्य केंद्रांसाठी आॅटोक्लेव्हबाबत ई निविदेद्वारे प्राप्त कमी दराच्या दरपत्रकास स्वीकृती, ककाणी, ता.साक्री येथील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या कामाची सुरक्षा अनामत परत करणे, पाचमौली व बसरावळ, ता.साक्री येथील पाणीपुरवठा योजनेच्या अनामत रकमा परत करण्याच्या विषयांचा समावेश होता.
दहाच वाहने उपलब्ध
जिल्ह्यात काही आरोग्य केंद्रांवर मानसेवी डॉक्टर नेमले आहेत. ते त्यांना वाहने उपलब्ध करून दिली का, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर निविदा प्रक्रियाच उशिरा झाल्याने वाहने उशिरा उपलब्ध झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.त्यामुळे पदाधिकाºयांनी या प्रश्नीही आरोग्य विभागावर ताशेरे ओढले. आतापर्यंत ११ पैकी १० च वाहने उपलब्ध झाल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.