मुंबईला जाणारा 7 लाखांचा गांजा वाहनासह जप्त; सांगवी पोलिसांची कारवाई, दोन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2023 05:31 PM2023-05-16T17:31:27+5:302023-05-16T17:31:55+5:30
इंदूरकडून मुंबई येथे एका खासगी कारमधून गांजासदृश अमली पदार्थ महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पकडण्यात आला.
राजेंद्र शर्मा
शिरपूर (धुळे) : इंदूरकडून मुंबई येथे एका खासगी कारमधून गांजासदृश अमली पदार्थ महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर पकडण्यात आला. कारमध्ये लपविलेला २ लाखांचा गांजा आणि ५ लाखांची कार असा ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली असून रात्री गुन्हा दाखल झाला. वाहनातील चालकासह दोघांना जेरबंद करण्यात आले.
एमएच ०३ सीपी ५८३३ या क्रमांकाच्या कारमध्ये मध्य प्रदेशकडून धुळ्याकडे गांजासदृश्य अमली पदार्थाची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली होती. हाडाखेड तपासणी नाक्याजवळ सापळा रचला. काही वेळाने इंदूरकडून सदरची कार आली. तिला थांबवून चौकशी करण्यात आली. त्यावेळी कारचालक रज्जाक मेगदाद शेख (वय ५४) रा. मुलुंड सिंधी कॉलनी मुंबई व साथीदार रिक्षाचालक विनोद रमेश शर्मा (वय ३३, रा. मुलुंड वेस्ट, मुंबई) या दोघांना विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने कारची तपासणी करण्यात आली. त्यात गांजासदृश अमली पदार्थ दिसून आला. १ लाख ९७ हजार रुपये किमतीचा गांजा व ५ लाखांची कार असा एकूण ६ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अंसाराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सुरेश शिरसाठ, पो.स.ई. सुनील वसावे, संजय सूर्यवंशी, पवन गवळी, मंगेश मोरे, जाकीर शेख, संदीप शिंदे, सागर ठाकूर, मनोज नेरकर, शिवाजी वसावे, जयेश मोरे, भगवान गायकवाड, कृष्णा पावरा, संतोष पाटील, मनोज पाटील, इसरार फारूकी यांच्या पथकाने ही कारवाई केली.