खान्देश मधून शिक्षणाच्या वारीला ७५० शिक्षक जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 04:16 PM2017-11-16T16:16:07+5:302017-11-16T16:16:55+5:30
नवोक्रम : नंदुरबारचे ३० जानेवारीला तर धुळे-जळगावचे शिक्षक १ फेब्रुवारीला भेट देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ अंतर्गत ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे विभागस्तरावर आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. यात खान्देशातून ७५० शिक्षक व १५० शालेय व्यवस्थापन समिती सदस्य जातील. नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक ३० जानेवारीला तर धुळे- जळगाव जिल्ह्यातील शिक्षक १ फेब्रुवारी २०१८ रोजी भेट देणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाद्वारे शैक्षणिक विचारांची उपयोगिता व परिणामकारकता याच्या आदानप्रदानासाठी विभाग पातळीवर ‘शिक्षणाची वारी’चे आयोजन करण्यात येत आहे. ‘शिक्षणाची वारी’आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे.
या उपक्रमामध्ये विविध विषय, घटक, संकल्पना यावर काम करणाºया संस्था, व्यक्ती यांचे साधारण ५० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. या स्टॉलला भेट देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील २०० प्राथमिक व ५० माध्यमिक शिक्षक तसेच ५० शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशा ३०० जणांना प्रतिदिन बोलविण्यात येणार आहे.
खान्देशातून ९०० जण जाणार
नाशिक विभागांतर्गत नाशिक येथेच या ‘शिक्षणाची वारी’ चे आयोजन केले आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील २५० शिक्षक व ५० व्यवस्थापन समिती सदस्य ३० जानेवारी २०१८ रोजी शिक्षणाच्या वारीला भेट देतील.
तर धुळे व जळगाव जिल्ह्यातील ५०० शिक्षक व १०० व्यवस्थापन समिती सदस्य १ फेब्रुवारी २०१८ रोजी शिक्षण वारीला भेट देणार आहे.
मोरे यांची स्टॉलधारक
म्हणून निवड
धुळे जिल्ह्यातून चुडाणे (ता. शिंदखेडा) येथील जि.प.शिक्षक सुनील दौलत मोरे यांची ‘माझी कला-कार्यानुभव’ या विषयांतर्गत ‘शिक्षणाची वारी’साठी स्टॉलधारक म्हणून निवड झालेली आहे. त्यांच्यासोबत शिंदखेडा तालुक्यातील जि.प.शाळेतील जगन दयाराम वाडीले (झिरवे), संतोष चिंधा साळुंके (बाम्हणे), योगिता बळवंत बोरसे (साबरहटी), महेंद्र रामदास महाजन (वरसूस) हे देखील असणार आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत १०० टक्के गुणवत्तापूर्ण शिक्षण ज्या शाळांमध्ये झाले, त्या शाळेतील उपक्रमशिल शिक्षकांनी केलेल्या ज्ञानरचनावादी साहित्य निर्मितीचा स्टॉलचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुधाकर बागूल यांनी दिली.